..तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2016 03:21 AM2016-10-08T03:21:58+5:302016-10-08T03:21:58+5:30
अभ्यासक्रमासाठी पैशांवर नव्हे तर गुणवत्तेवर प्रवेश दिला जाणार असल्याची मुख्यमंत्री फडवणीस यांनी ग्वाही दिली.
अकोला, दि. 0७- वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी नियमांची पायमल्ली करणारे, खोटे रेकॉर्ड दाखवून, पैसे घेऊन, धनदांडग्यांच्या मुलांना नियमबा पद्धतीने प्रवेश देत असतील, तर अशा वैद्यकीय महाविद्यालयांवर थेट फौजदारी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन आणि शस्त्रक्रियागृहाचे (ओ.टी.) लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील होते. तर अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार संजय धोत्रे व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की वैद्यकीय शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले पाहिजे. या अभ्यासक्रमासाठी पैशांवर नव्हे तर गुणवत्तेवर प्रवेश मिळाला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे; मात्र काही धनदांडग्यांची महाविद्यालये वैद्यकीय प्रवेशासाठी वारेमाप पैसे उकळतात, अशा अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. गिरीश महाजन यांनी याबाबत मला कारवाईसाठी परवानगी मागितली असून, अशा महाविद्यालयांवर थेट फौजदारी करावाई करा, असे स्पष्ट निर्देश त्यांना देत आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजना नोव्हेंबरमध्ये!
शेतकरी आत्महत्यांमागे त्यांच्या घरातील आजारपण व त्याचा खर्च हेसुद्धा महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच येत्या नोव्हेंबरमध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू करीत आहोत. या योजनेमध्ये तब्बल १२00 आजारांचा समावेश करण्यात आला असून, त्याचा लाभ शेतकर्यांना मोठय़ा प्रमाणात होईल. या योजनेत आठशे खासगी रुग्णालयांचा समावेश राहणार असून, ही योजना संपूर्णपणे कॅशलेस असेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.