...तेव्हा मंत्रिपदासाठी कोट्यवधींची मागणी झाली, मी १ कोटी चेकने दिले, केसरकरांचा सनसनाटी दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:33 PM2024-02-07T12:33:21+5:302024-02-07T12:35:15+5:30
Deepak Kesarkar News: कोकण दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या आणि नंतर शिंदे गटात गेलेल्या दीपक केसरकर यांचा उल्लेख डबल गद्दार असा केला होता. मात्र या टीकेला आता दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
नुकतेच कोकणच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या आणि नंतर शिंदे गटात गेलेल्या दीपक केसरकर यांचा उल्लेख डबल गद्दार असा केला होता. मात्र या टीकेला आता दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीली शिवसेनेत असताना मंत्रिपद देण्यासाठी माझ्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच मी स्वत: एक कोटी रुपयांचा चेक दिला होता. याचे पुरावे मी देऊ शकतो, असा सनसनाटी दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.
दीपक केसरकर उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, शिवसेनेमध्ये मंत्रिपद देण्यासाठी माझ्याकडे कोट्यवधी रुपये मागण्यात आले होते. मात्र मी ही मागणी पूर्ण करण्यात कमी पडलो. त्यामुळे माझी मंत्रिपदाची संधी डावलण्यात आली. मात्र तरीही मी सुमारे १ कोटी रुपयांचा चेक दिला होता. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.
तसेच एकदा जवळपास दोन महिने मी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जवळपास दोन महिने प्रयत्न केले. मी वर्षा निवासस्थानाबाहेर वाट पाहायचो मात्र, मला भेट नाकारली गेली, असा दावाही त्यांनी केला. माझं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी चर्चेत असताना मला राज्यमंत्रिपद दिलं गेलं. तरीही मी शांत बसलो.मग मी गद्दार कसा, असा प्रतिप्रश्न दीपक केसरकर यांनी विचारला आहे.
दीपक केसरकर हे दर आठवड्यात शिर्डीला जातात. मात्र त्यांची कुठल्याही पक्षावर श्रद्धा नाही आणि कुठल्याही पक्षात थांबण्याएवढीत त्यांच्यात सबुरी नाही. त्यांच्या नसानसात गद्दारी भरली आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यालाही केसरकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या श्रद्धेवर संशय घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मी शिर्डीहून आणलेली शाल परिधान केल्यावर त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याचं स्वत: रश्मी ठाकरे यांनी सांगितले होते. मग आता उद्धव ठाकरे खोटं का बोलत आहेत, असा सवालही दीपक केसरकर यांनी विचारला.