...मग मुख्यमंत्री काय वडिलांची इच्छा पूर्ण करायला झालात का?; चंद्रकांत पाटलांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 04:57 PM2020-01-03T16:57:57+5:302020-01-03T16:58:35+5:30
स्व. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही पद घेतले नाही, त्यांनी ठरविले असते तर राष्ट्रपतीसुद्धा त्यांना बनता आलं असतं.
पुणे - राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळविले त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर राहावं लागलं. विरोधी पक्षातील भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी झालात का? असा सवाल केला आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एका कार्यक्रमात सांगतात, साखरेचा विषय आला तर मी जयंत पाटलांकडे पाहतो, महसूलचा विषय आला तर मी बाळासाहेब थोरातांकडे पाहतो. मग तुम्ही काय करता? केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का? मग राज्याला असा मुख्यमंत्री चालणार का? अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली.
तसेच अवेळी पावसाच्यावेळी ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, बांध काय आहे हे तुम्हाला कळतं नाही, एकर, हेक्टर याचा फरक माहित नाही. हेक्टर म्हणजे काय? एका हेक्टरमध्ये किती एकर, एक एकरात किती गुंठे अन् एका गुंठ्यात किती चौरस फूट जागा असते हे पहिलं सांगा. एमएसपी, एफआरपी हे सुद्धा कळत नाही. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे माहिती नाही असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला.
दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही पद घेतले नाही, त्यांनी ठरविले असते तर राष्ट्रपतीसुद्धा त्यांना बनता आलं असतं. पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना कोणताही अनुभव नसताना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं त्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. सत्तेसाठी सरकारने नीतीमुल्ये सोडली आहेत. जनतेच्या प्रश्नांचे त्यांना काही पडलेले नाही. सत्तावाटपात १५ मंत्रिपदे आली त्यातील ३ घटकपक्षांना दिली. उरलेल्या १२ मंत्रिपदातही स्वत:च्या घरात २ मंत्रिपदं घेतली. उरलेल्या १० जणांना सगळ्यांना सामावून घेता येत नाही म्हणून ज्येष्ठ नेत्यांना घरी पाठविले अशी टीका चंदकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली.
महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका
खासदारांसमोरच आंदोलक महिलांच्या नदीत उड्या; सर्वांचीच उडाली तारांबळ!
नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत?; ममता बॅनर्जींनी केला सवाल
'आयुष्यमान भारत' योजनेत मोठा घोटाळा उघडकीस; गुजरातमध्ये एकाच कुटुबांला दिले १७०० आरोग्य कार्ड
शिवसेना भगव्यात नाही, काँग्रेसच्या रंगात रंगलीय; नितीन गडकरींची टीका