...तर बारावीला अपात्र
By Admin | Published: July 23, 2016 01:28 AM2016-07-23T01:28:56+5:302016-07-23T01:28:56+5:30
इयत्ता अकरावीला आॅफलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेला बसण्यास अपात्र ठरविण्यात येणार आहे.
पुणे : इयत्ता अकरावीला आॅफलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेला बसण्यास अपात्र ठरविण्यात येणार आहे. सर्व प्रवेश आॅनलाइनच होणार असून आॅफलाइन प्रवेश बेकायदेशीर असतील, असे विभागीय शिक्षण उपसंचालक व प्रवेश समितीचे अध्यक्ष दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अद्याप अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश समितीने स्वतंत्रपणे आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
आॅनलाइन अर्ज केलेल्या ७३ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी केवळ १४२ विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीअखेर प्रवेश अॅलॉट करण्यात आलेले नाहीत. तसेच ७३ हजार ८१९ विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार २४४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अद्याप हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.
या विद्यार्थ्यांच्या
प्रवेशावरून सध्या गोंधळाचे वातावरण आहे. त्याबाबत टेमकर व इतर अधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यामुळे उर्वरित प्रवेशही आॅनलाइन घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात आॅफलाइन
प्रवेश दिला जाणार नाही. असे झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांस बारावीच्या परीक्षेला बसण्यास अपात्र ठरविण्यात येईल.
राज्य मंडळास इयत्ता अकरावीमध्ये आॅनलाइन पद्धतीने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती कळविली जाईल. तसेच अकरावी व बारावीची कनिष्ठ महाविद्यालयांची संच मान्यता आॅनलाइन पद्धतीने प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येवरच अवलंबून राहणार आहे, असे टेमकर यांनी स्पष्ट केले आहे.
>अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
१. दि. २७ जुलै (सायं. ५ वाजता) : अॅलॉट करूनही प्रवेश न घेतलेले (नॉट रिपोर्टेड) विद्यार्थ्यांनी पुन्हा कॉलेज अॅलॉट झाल्याचा संदेश संकेतस्थळाच्या होमपेजवर आॅनलाइन अर्ज क्रमांक टाकून पाहणे.
२. दि. २८ जुलै (सकाळी ११ ते ४) आणि दि. २९ जुलै (सकाळी १० ते १२) : अॅलॉट झालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्याने प्रवेश घेणे व महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश आॅनलाइन अपडेट करणे.
३. दि. २९ जुलै : ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत, अर्धवट अर्ज भरले आहेत, तसेच चारही फेऱ्यांमध्ये अॅलोकेशन न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाचव्या फेरी घेतली जाईल. त्याची सविस्तर कार्यपद्धती २९ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल.
३ (अ). दि. ३० जुलै ते २ आॅगस्ट : फक्त नवीन विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज सादर करणे. अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्याने भाग-१ व भाग-२ पूर्ण करून आॅनलाइन सबमिट करणे.
३ (ब). दि. ४ आॅगस्ट : गुणवत्ता यादी जाहीर करणे
३ (क). दि. ५ व ६ आॅगस्ट : संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे
४. दि. ७ आॅगस्ट : ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळाले आहे, शाखा, माध्यम चुकीचे निवडले आहे, शाखा बदल करायवयाचा आहे, प्राधान्यक्रम चुकला आहे, जुलै २०१६ मध्ये झालेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांच्यासाठी विशेष आॅनलाइन फेरीचे आयोजन करण्याबाबत सविस्तर कार्यपद्धती प्रसिद्ध केली जाईल. (याकरिता नव्याने नोंदणी व नव्याने शुल्क भरणे आवश्यक).
४ (अ). दि. ९ ते १३ आॅगस्ट : पहिली विशेष फेरी
४ (ब). दि. १२ ते २३ आॅगस्ट : दुसरी विशेष फेरी
४ (क). दि. २५ ते ३० आॅगस्ट : तिसरी विशेष फेरी
>आॅफलाइन प्रवेशाची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाची राहील. तसेच आॅफलाइन प्रवेश आढळल्यास उच्च न्यायालयाचा अवमान समजून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल,
- दिनकर टेमकर, विभागीय शिक्षण उपसंचालक