...तर ‘त्या’ डॉक्टरांना गोळ्या घालू, हंसराज अहिर यांचे वादग्रस्त वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:54 AM2017-12-26T06:54:45+5:302017-12-26T06:55:00+5:30
चंद्रपूर : मी जनतेने निवडून दिलेला खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री आहे. मी येथे येणार हे माहिती असताना डॉक्टर कसे रजेवर जाऊ शकतात? त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी येथे केले. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा रुग्णालयात मेडिकल स्टोअर्सचे लोकार्पण अहिर यांच्या हस्ते झाले. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पूर्वनियोजित असताना जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांनी दांडी मारली. शल्य चिकित्सक व अधिष्ठाता रजेवर गेल्याचे पाहून मंत्री अहिर यांचा पारा चढला. ते म्हणाले, सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात दररोज २४ तास या मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून औषधांची उपलब्धता होईल. ही एक प्रकारे रुग्णसेवाच आहे. अशा लोकोपयोगी कार्याचा शुभारंभ होत असताना रुग्णालयाचे डॉक्टर्स कसे रजेवर जाऊ शकतात? त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू. अहिर यांचे हे वक्तव्य वृत्त वाहिन्यांवर दाखवले जाताच डॉक्टर वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटली.