Gopichand Padalkar : "...तर सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहील", गोपीचंद पडळकरांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 10:31 AM2021-11-10T10:31:07+5:302021-11-10T10:32:46+5:30
Gopichand Padalkar : आज एसटी कर्मचाऱ्यांना तुमच्या मदतीची, धीराची, आपुलकीची गरज आहे. कारण एसटी कर्मचारी जगतील तरच महाराष्ट्राची लालपरी जगेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
मुंबई : राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपावरून आणि आत्महत्येवरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
एखादा व्यक्ती ज्यावेळी हतबलतेमुळे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलतो, त्यावेळी त्याच्यावर बिकट परिस्थिती असते. अशा परिस्थितीत त्याला धीर देऊन आत्महत्येच्या विचारातून बाहेर काढायचे असते. पण सरकारने कालपासून एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे, अवमान याचिका दाखल करण्याची मिडीयाद्वारे धमकी देणे, असे प्रकार सुरु असल्याचे सांगत गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली.
गोपीचंद पडळकर म्हणाले, "जागोजागी व गावोगावी पोलीस बळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखले जाते आहे. यावरून सिद्ध होते की शांततेत लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात अनिल परबांना उद्रेक घडवायचा आहे. जेणेकरून व पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचा वापर हतबल कर्मचाऱ्यांवर करण्याची मोकळीकच अनिल परबांना मिळेल. यांच्या निजामशाहीमुळे जर कुठल्या कर्मचाऱ्याने हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहील."
एसटी कर्मचारी जगतील तरच महाराष्ट्राची लालपरी जगेल - गोपीचंद पडळकर https://t.co/CbvSFUBywh#GopichandPadalkarpic.twitter.com/zAL6bSGLYW
— Lokmat (@lokmat) November 10, 2021
याचबरोबर, मला संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करायचे की तुमच्या सुखा-दुखात साथ देणाऱ्या लालपरीचे कर्मचारी आज आत्महत्येच्या दारात आहेत. आज त्यांना तुमच्या मदतीची, धीराची, आपुलकीची गरज आहे. कारण एसटी कर्मचारी जगतील तरच महाराष्ट्राची लालपरी जगेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.