...तर आर्थिक संकट अटळ
By admin | Published: November 2, 2016 01:20 AM2016-11-02T01:20:46+5:302016-11-02T01:20:46+5:30
गुंतवणूक वाढल्यानंतर अर्थव्यवस्था ‘पिकअप’ घेते. हा अनुकूल निर्णय झाल्यास अर्थव्यवस्था चांगल्या दिशेने जाईल.
बारामती : गुंतवणूक वाढल्यानंतर अर्थव्यवस्था ‘पिकअप’ घेते. हा अनुकूल निर्णय झाल्यास अर्थव्यवस्था चांगल्या दिशेने जाईल. मात्र, तसे न करता केवळ कठोर नियम करण्याचे सूत्र स्वीकारल्यास मोठे आर्थिक संकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
दि बारामती मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दिवाळी पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, की पंतप्रधानांनी दोन वर्षांत अर्थव्यवस्था शिस्तीच्या चौकटीत आणणार असल्याचे सांगितले आहे. सध्या दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील काळात गुंतवणूक वाढविणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. येत्या सहा महिन्यांत अमेरिकेबरोबरच सरकारच्या धोरणाचे परिणाम दिसतील.
ऊस उत्पादक, व्यापारी, कारखाना या तिघांना ही धोरणे घातक आहेत, असे पवार यांनी सांगितले. दि बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्ष योगेश जगताप, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर, बारामती अॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर कदम, पोपटराव तुपे, सदाशिव सातव, सचिन सातव, सुभाष ढोले, इम्तियाज शिकीलकर, किशोर शहा, जवाहर वाघोलीकर, अरविंद जगताप, जयकुमार वडुजकर, वैभव शिंदे, विशाल वडुजकर, प्रमोद खटावकर आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
>यंदा चांगल्या पावसामुळे उसाच्या लागवडीत वाढ होईल. त्यामुळे पुढील वर्षी ऊस गळीताचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
साखरेबाबत केंद्र शासनाचे निर्णय अयोग्य आहेत. साखर निर्यातीवर २० टक्के कर बसविला. साठा न करता साखर विक्री केलीच पाहिजे. विक्री न केल्यास कारवाई केली जाणार आहे. साखरेच्या साठ्यावर अधिक मर्यादा आणा, लवकर साखर विका, त्यातुन किंमत कशी देणार, हा माझ्यासारख्याला पडलेला प्रश्न आहे.