...तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसू

By admin | Published: July 12, 2017 04:49 AM2017-07-12T04:49:53+5:302017-07-12T04:49:53+5:30

नेवाळीतील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी लवकरच जेलभरो आंदोलन करू.

... then go to the Chief Minister's house | ...तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसू

...तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नेवाळीतील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी लवकरच जेलभरो आंदोलन करू. त्याउपरही सरकारला जाग आली नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यात घुसून तेथेच ठाण मांडू, असा इशारा शेतकरी सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांनी मंगळवारी दिला आहे.
शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने १० जुलैपासून राज्यभरात ‘जनजागरण यात्रा’ काढण्यात आली आहे. नाशिकहून निघालेली ही यात्रा ठाणे जिल्ह्यात आली असल्याने समितीने नेवाळीतील शेतकऱ्यांची भेट घेतली. समितीचे निमंत्रक डॉ. नवले यांच्यासह पदाधिकारी नामदेव गावडे, मधुकर पाटील, सुशिला मोराळे, किसन गुजर आणि खंडू वाघचौरे यांनी भाल गावातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. या वेळी संजय चिकणकर, संतोष केणे, काळू कोमास्कर, गणेश म्हात्रे आदी पदाधिकारी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित होते.
ब्रिटीश काळात नेवाळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्या परत केलेल्या नाहीत. नेवाळीतील शेतकऱ्यांचा लढा मोठा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संयम ठेवावा लागेल. ब्रिटीश सरकारची नीती ‘फोडा आणि झोडा’ ही होती. केंद्र व राज्य सरकार त्याचाच अवलंब करीत असल्याचा आरोप नवले यांनी केला. नेवाळीतील शेतकरी स्वातंत्र्यानंतरही त्याच्या शेतजमिनीसाठी लढा देत असल्याने, तो खऱ्या आजही पारतंत्र्यात जगत असल्याचे नवले म्हणाले. सरकार पोलीस व शेतकऱ्यांना भिडवून देते. पोलीस हादेखील शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने खऱ्या अर्थाने सरकारने दोन भावांमध्ये भांडण लावून दिल्याचा आरोपही नवले यांनी केला.
सुकाणू समितीचे पदाधिकारी गावडे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने २०१३ साली भूसंपादनाचा कायदा आणला. या कायद्यानुसार अन्नधान्य पिकवित असलेली जमीन सरकार शेतकऱ्यांची ७० टक्के सहमती असल्याशिवाय संपादित करू शकत नाही. नेवाळीतील जमीन घेण्यास शंभर टक्के शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या कायद्यानुसारही सरकारची बाजू चुकीची आहे. या लढ्यात सुकाणू समिती व समितीला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या ३२ संघटना ‘नेवाळी जमीन बचाव आंदोलन समिती’च्या बाजूने उभ्या राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुकाणू समितीच्या ‘जनजागरण यात्रे’चा समारोप पुण्यात होणार आहे. त्या ठिकाणी नेवाळीतील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी यावे, असे आमंत्रण पदाधिकाऱ्यांनी दिले. समृद्धी मार्गाला विरोध करणारे विश्वनाथ पाटील यांनी नेवाळीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. नेवाळीतील शेतकऱ्यांचा संघर्ष यशस्वी ठरल्यावर, याच परिसरात विजयोत्सवाची समितीच्या वतीने सभा घेतली जाईल, असेही नवले यांनी स्पष्ट केले.
>शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा - डॉ. अजित नवले
विक्रमगड : मंगळवारी विक्रमगडमध्ये कुणबी सेना, माकप व सुकाणू समितीने एकत्र येऊन निर्धार मेळावा घेतला. या वेळी समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन, सातबारा कोरा, नाहीतर सरकारची सरसकट उचलबांगडी करा, अशी हाक शेतकरी बांधवांना दिली.
या वेळी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सरकार भांडवलदारानांच पोसतेय, असे सांगत शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याची टीका केली. मेळाव्यासाठी सुकाणू समितीचे सदस्य सुशिला मोराले (मराठवाडा), ज्योत्स्ना विसपुते (जळगाव), माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, कॉ़ अशोक ढवळे, छावा संघटनेचे करण गायकर, कॉ़ मधुकर पाटील, कॉ.किसन गुजर, नामदेव गावडे, राजा गहला, किरण गहला आदी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यासाठी शासनाने ५ टक्केही कर्जमाफी दिलेली नाही, यावरही या वेळी प्रकाशझोत टाकण्यात आला.

Web Title: ... then go to the Chief Minister's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.