...तर सरकारचा काढणार काटा
By admin | Published: February 13, 2015 01:10 AM2015-02-13T01:10:21+5:302015-02-13T01:14:33+5:30
रामदास आठवलेंचा इशारा : आरपीआयचा कुडाळात कार्यकर्ता मेळावा
कुडाळ : सध्याचे हे सरकार आमच्यामुळेच स्थापन झाले असून, ‘आम्हाला दिला नाही सत्तेचा वाटा तर लवकरच या सरकारचा काढू काटा’ अशा काव्यपंक्तींमधून शिवसेना-भाजप सरकारला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी कुडाळ येथील कोकण विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात गर्भित इशाराच दिलेला आहे. तसेच आरपीआयची शाखा सर्व गावागावात निर्माण करून जनतेचे प्रश्न, समस्या सोडवा, असे आवाहनही कार्यकर्त्यांना केले.
कुडाळ येथील कुडाळ ओमकार डिलक्स सभागृहामध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाचा कोेकण विभागीय कार्यकर्ता मेळावा गुरूवारी पार पडला. या मेळाव्याला कोकण प्रदेश अध्यक्ष रमाकांत यादव, कोकण प्रदेश सचिव सचिन मोहिते, सिंधुदुर्ग पक्षनिरीक्षक मधू मोहिते, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष सिध्दार्थ कासारे, लोकसभा निरीक्षक तानाजी कांबळे, गोव्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, जिल्हा सरचिटणीस सत्यवान साठे, जिल्हा उपाध्यक्ष शामसुंदर वराडकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आत्माराम कुडाळकर, महादेव शिंदे, रमाकांत जाधव, गणपत जाधव, बाबुराव केळूसकर व इतर आरपीआयचे सदस्य उपस्थित होते.
खासदार रामदास आठवले यांनी आपल्या भाषणातून अनेक विनोद निर्माण करून कार्यकर्त्यांना फक्त पदे घेऊन मिरवू नका, पक्ष संघटनावाढीसाठी काम करा, जनतेचे प्रश्न सोडवा, ज्यांना पदाचा उपयोग करता येत नसेल, त्यांनी पदावरून दूर व्हावे किंवा बाजूला व्हावे, असा सल्लाही या मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला. आरपीआय हा पक्ष फक्त दलितांचा नसून, हा पक्ष देशातील प्रत्येक नागरिकाचा आहे. जनतेच्या सर्व समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी सर्व गावागावात आरपीआयच्या शाखा निर्माण करा, असे आवाहन खासदार आठवले यांनी केले.
शासनाने कोकणचा विकास होण्यासाठी निधीची तरतूद व्हावी, याकरिता कोकण प्रदेश वैज्ञानिक विकास महामंडळाची स्थापना केली. मात्र, या मंडळाच्या निधीचा कोकणाला कोणताही फायदा कोणत्याच सरकारने अद्याप दिला नाही. हा निधी पश्चिम महाराष्ट्राकडे वळविला जात असल्याचा खुलासा यावेळी मधू मोहिते यांनी केला. येथील पालकमंत्री यांनी यासंदर्भात श्वेतपत्रिका काढून हा निधी कुठे जातो, याची माहिती घ्यावी, असेही वक्तव्य केले.
जपानमध्ये स्फोट झाल्यानंतर या अणुऊर्जेमुळे देशाचे काय नुकसान होते, हे पाहून जगातील बहुतांशी देशांनी नाकारलेल्या या विध्वंसक जैतापूर येथे होणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाला या सरकारने मंजुरी दिल्यास त्याचे परिणाम पुढच्या पिढीला निश्चितच भोगावे लागणार आहेत, असेही मोहिते म्हणाले. सिध्दार्थ कासारे म्हणाले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली चळवळ जर कोणी संपविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर शेळी होऊ नका. वाघ बनून अन्यायाविरोधात लढा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटना वाढवा व मोठ्या संख्येने ५ एप्रिल रोजी मुंबई येथे होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी कांबळे यांनी केले. या मेळाव्याला रायगड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा राज्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सरकारात आम्ही कुठे : आठवले
आम्ही ज्यांना पाठिंबा देतो, त्यांचे सरकार येते. महायुतीचे सर्व खासदार, शिवसेनेचे सर्व आमदार आरपीआयमुळेच निवडून आले. परंतु हे सर्वजण मंत्रालयात आणि आम्ही मात्र बाहेर. त्यामुळे या सरकारात आम्ही नेमके कुठे आहोत हेच आम्हाला समजत नाही, असे आठवले यांनी सांगितले. गेल्यावेळी काँगे्रसवाल्यांना आम्ही सहकार्य केले. मात्र, त्यांनी आम्हाला फसविले. आता सेना-भाजपला आम्ही सहकार्य केले असून, आमचा अधिकार आम्हाला देण्यासाठी आम्हाला सत्तेतील आमचा वाटा मिळावा. नाही तर आम्ही तुमचा काटा काढू, असा सूचक इशाराही आठवले यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.