..तर सरकारला ग्रहण लावणार
By admin | Published: March 10, 2016 12:48 AM2016-03-10T00:48:17+5:302016-03-10T00:48:17+5:30
गेल्या ५० वर्षांपासून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागासलेल्या समाजाला ‘एसटी’मध्ये समावेश करून सवलती द्याव्यात, अशी शिफारस कालेलकर समितीने
जेजुरी : गेल्या ५० वर्षांपासून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागासलेल्या समाजाला ‘एसटी’मध्ये (अनुसूचित जमाती) समावेश करून सवलती द्याव्यात, अशी शिफारस कालेलकर समितीने केंद्र सरकारला केली होती. मात्र, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करीत आहे. चालू अधिवेशनात आरक्षणाबाबत ठोस निर्णय न झाल्यास राज्यातील अवघा धनगर समाज एकवटून आंदोलनाद्वारे सरकारला ग्रहण लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीचे नेते आमदार प्रकाश शेंडगे यांनी जेजुरी येथे दिला आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या आरक्षणातील सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी आजपासून जेजुरी ते मुंबई, असे मोटरसायकल रॅलीचे आयोजन आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जेजुरीगडावर खंडेरायाचा विधिवत पूजा-अभिषेक करूनत बेलभंडाऱ्याची उधळण करीत रॅलीला प्रारंभ करण्यात आला.
या वेळी आरक्षण कृती समितीचे नेते पांडुरंग मिरगर, नाना देवकाते, भीमदेव बुरुंगुले, कल्याणी वाघमोडे, माणिकराव सोलनकर, आबा मुरारी, राधाकृष्ण पाटील, बबन मदने, रमेश लेंडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेंडगे म्हणाले, धनगर समाजबांधवांचे आराध्यदैवत खंडेराया असल्याने देवाचे आशीर्वाद घेऊन बेलभंडारा उधळून रॅलीची सुरुवात केली आहे. खोपोली येथील शिंगरोबा यांचे दर्शन घेऊन गुरुवारी (दि. १०) आझाद मैदान मुंबई येथे हजारो बांधवांच्या उपस्थितीत आरक्षण मागणीसाठी बेलभंडारा उधळणार आहोत. २०१४च्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सरकार स्थापन होऊ द्या; पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. ४ जानेवारी २०१५ रोजी नागपूर येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाजाला ‘अच्छे दिन’चे प्रलोभन दाखविले होते.