...तर हमिद अन्सारींनी देश सोडून जावे, इंद्रेश कुमार यांची विखारी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 09:06 PM2017-08-12T21:06:12+5:302017-08-12T21:06:23+5:30
देशाचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. जर त्यांना देशात असुरक्षित वाटत आहे तर त्यांनी मुस्लिमांना सुरक्षित वाटते असा देश सांगावा. उरलेले आयुष्य त्यांनी तेथेच व्यतीत करावे, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी अन्सारींवर जोरदार टीका केली आहे.
नागपूर, दि. 12 - देशाचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. जर त्यांना देशात असुरक्षित वाटत आहे तर त्यांनी मुस्लिमांना सुरक्षित वाटते असा देश सांगावा. उरलेले आयुष्य त्यांनी तेथेच व्यतीत करावे, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी अन्सारींवर जोरदार टीका केली आहे. देशातील मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य हमिद अन्सारी यांनी मागील आठवड्यात केले होते.
नागपुरात शनिवारी मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे मुस्लिम महिलांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. हमिद अन्सारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कुणीही त्यांच्या समर्थनार्थ समोर आले नाही. देशातील अनेक भागांत मुस्लिमांनी त्यांचा विरोध केला. ते जेव्हा उपराष्ट्रपती होते तेव्हा भारतीय, धर्मनिरपेक्ष व सर्व पक्षांचे होते. मात्र खुर्चीवरून उतरत असताना ते सांप्रदायिक, कट्टरपंथी व कॉंग्रेसचे झाले. उपराष्ट्रपती असताना त्यांना कधी असुरक्षित असल्याचे वाटले नाही. मग आताच कसे काय वाटले, असा प्रश्न इंद्रेश कुमार यांनी उपस्थित केला. हमिद अन्सारी यांना सुरक्षित असा दुसरा देश सापडला तर तेथे स्थायिक होण्यास आम्ही त्यांची मदत करू. या मुद्यावर कॉंग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेदेखील ते म्हणाले.
देशभरात ‘छोडो पीओके’ मोहीम
पाकव्याप्त काश्मीरने पाकिस्तानला आपले मानलेले नाही. तेथे आजदेखील एकिकृत काश्मीर व भारताचे नारे लागतात. मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे ९ ते १४ आॅगस्ट या कालावधीत देशभरात ‘छोडो पीओके’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत १४ आॅगस्ट रोजी देशभरात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात येईल. याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या व गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या जम्मू काश्मीर विधिमंडळातील जागा निवडणूका किंवा नामनिर्देशनाच्या माध्यमातून भरण्यात याव्या, अशी त्यांनी मागणी केली. हिंसेपेक्षा संवादातून मार्ग काढण्यावर भर दिला पाहिजे, असेदेखील ते म्हणाले.
कॉंग्रेसने स्वातंत्र्य नाही, फाळणी दिली
संघाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नव्हता, अशी टीका करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात त्यावेळी कॉंग्रेस ही एक चळवळ होती. देशासाठी लढणारे सर्व नागरिक त्या चळवळीत सहभागी झाले होते. त्यात स्वयंसेवकदेखील होते. आताचा कॉंग्रेस पक्ष व ती चळवळ यात प्रचंड फरक आहे. कॉंग्रेस पक्ष झाल्यावर त्याने देशाला स्वातंत्र्य दिले नाही तर देशाचे तुकडे करून फाळणी दिली. संघाच्या शाखांमध्ये अगोदरपासूनच तिरंगा फडकविण्यात येत असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.
चीन जगात एकटा पडलाय
चीनकडून भारताला वारंवार धमक्या देण्यात येत आहेत व संबंध खराब होतील, असे म्हणण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात केंद्र शासनाने डोकलामच्या मुद्यावर कणखर भूमिका घेतली आहे. जगात आपले अनेक मित्र आहे. मात्र चीनचा एकही मित्र नाही. कूटनीतीद्वारे आपण चीनला जगात एकटे पाडले आहे, असे प्रतिपादन इंद्रेश कुमार यांनी केले.