...तर रुग्णालयांना टाळे ठोका - एकनाथ खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:28 AM2018-03-21T01:28:09+5:302018-03-21T01:28:09+5:30
आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांना पत्र लिहूनही डॉक्टरच मिळत नसतील तर सरकारी दवाखान्यांना समारंभपूर्वक टाळे ठोका, या शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा विधानसभेत सरकारवर हल्ला चढविला.
मुंबई : आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांना पत्र लिहूनही डॉक्टरच मिळत नसतील तर सरकारी दवाखान्यांना समारंभपूर्वक टाळे ठोका, या शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा विधानसभेत सरकारवर हल्ला चढविला.
जळगावमधील ग्रामीण रुग्णालयांचा बोजवारा उडाला असून रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये दोन-तीन वर्षे डॉक्टर नाहीत, टेक्निशियन नाहीत, अन्य पदभरती नाही, लोडशेडिंगमुळे शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत. सरकार लोकांच्या आरोग्याशी खेळत असून केवळ थातूरमातूर उपाययोजना करीत असल्याचा आरोप करतानाच यासंदर्भात आपण आरोग्य मंत्री सावंत यांना पत्र लिहून वस्तूस्थिती सांगितली. पण सहा महिने झाले तरी त्यांनी उत्तर दिले नसल्या टीकाही खडसे यांनी केली. खडसे यांनी मुंबईतील जे.जे.रुग्णालयातील असुविधांकडे लक्ष वेधत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. एका गरोदर महिलेला जे.जे.मध्ये व्हेंटिलेटर नसल्याने दाखल करून घेण्यात आले नाही. उपचाराअभावी त्या महिलेचा मृत्यू झाला, असे सांगतानाच याला जबाबदार कोण? असा सवाल खडसे यांनी केला.