Nitin Deshmukh: "...तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन", नितीन देशमुखांचा शिंदे गटाला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 09:33 AM2022-09-19T09:33:30+5:302022-09-19T09:34:08+5:30
Nitin Deshmukh: जून महिन्यात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडावेळी एकनाथ शिंदेंसोबत गेलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख गुवाहाटीवरून माघारी परतले होते. दरम्यान, तेव्हापासून नितीन देशमुख हे सातत्याने शिंदे गटावर आक्रमकपणे टीका करत आहेत.
मुंबई - जून महिन्यात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडावेळी एकनाथ शिंदेंसोबत गेलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख गुवाहाटीवरून माघारी परतले होते. दरम्यान, तेव्हापासून नितीन देशमुख हे सातत्याने शिंदे गटावर आक्रमकपणे टीका करत आहेत. आता नितीन देशमुख यांनी राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे गटावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाचे सूरत ते गुवहाटीमधील अनेक व्हिडीओ आपल्याकडे आहेत, असा दावा नितीन देशमुख यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये केला आहे.
शिवसैनिकांशी संवाद साधताना नितीन देशमुख म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माझी लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू कऱण्यात आली आहे. खरंतर माझी ईडीकडून चौकशी करायला हवी होती, ईडीकडून चौकशी झाली असती तर समाजात माझा मान वाढला असता, अशी खोचक टीका नितीन देशमुख यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, माझ्याविरोधात जर कारवाई केली तर माझ्याकडे अनेक व्हिडीओ तयार आहेत. ते मी उघड करेन. ५० खोके एकदम ओकेचं षडयंत्र गेल्या दीड वर्षांपासून सुरू होतं. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे, सत्तांतर घडवणाऱ्यांचे माझ्याकडे व्हिडीओ आहेत. हे सत्तांतर पैशांच्या माध्यमातून झाले आहे हे मी सिद्ध करेन. जर मी ते सिद्ध करू शकलो नाही, तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन, असा थेट इशाराच नितीन देशमुख यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेनेला डुप्लिकेट सेना म्हणणाऱ्या नारायण राणेंचाही नितीन देशमुख यांनी समाचार घेतला. नारायण राणेंनी शिवसेनेला डुप्लिकेट सेना म्हटल्याचं ऐकलंय. पण तुम्ही पाहिलं तर नारायण राणेंच्या डोक्यावर खोटे केस आहेत. वयाच्या ७० व्या वर्षी डुप्लिकेट केस लावावे लागतात, याची तुम्हाला लाज वाटू द्या, असा टोला नितीन देशमुख यांनी लगावला.