...तर मीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही - भाई वैद्य

By admin | Published: March 21, 2016 12:44 AM2016-03-21T00:44:24+5:302016-03-21T09:21:05+5:30

भारतीय संविधानात नागरिकत्वाची व्याख्या बदलून जो ‘भारतमाता की जय’ असे म्हणेल तोच भारतीय अशी भूमिका घेतल्यास मी आयुष्यात कधीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही

... then I would not say 'Bharatmata Ki Jai' - Bhai Vaidya | ...तर मीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही - भाई वैद्य

...तर मीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही - भाई वैद्य

Next

पुणे : भारतीय संविधानात नागरिकत्वाची व्याख्या बदलून जो ‘भारतमाता की जय’ असे म्हणेल तोच भारतीय अशी भूमिका घेतल्यास मी आयुष्यात कधीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असल्यापासून ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणत आलो आहे. तेव्हा संघातील लोकांना एकदाही या घोषणेची आठवण आली नाही. मात्र, आता केवळ राजकारणासाठी कोणी देशप्रेम दाखवत असेल तर त्याचा मी धिक्कार करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी रविवारी केले.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समाजप्रबोधन पुरस्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. मंडळाच्या उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, नागपूरमधील मुस्लिम महिला मंचाच्या अध्यक्षा रुबिना पटेल, पुरस्कारार्थी सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, डॉ. विश्वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी व तमन्ना शेख इनामदार व्यासपीठावर होते. ‘राईट टू पी’ ही चळवळ चालविणाऱ्या मुमताज शेख यांना यंदाचा समाजप्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संघाच्या विविध घटनांतून मुस्लिम समाजाला वेगळे करायचे असे संघाने ठरविले आहे का हे पाहायला हवे. राज्य संस्था ही धर्मनिरपेक्ष असायला हवी. त्यामुळे मोहन भागवतांना हे संविधान मान्य आहे का, हे तपासून पाहायला हवे, अशी टीकाही भाई वैद्य यांनी केली.
संघाने मुलांना फुलपँट देताना महिलांना काय दिले, याचाही विचार व्हायला हवा. महिलांच्या सबलीकरणासाठी संघ काय करतोय, याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे बाबा आढाव म्हणाले. आताचे सरकार हे संस्कृतीकडे जाणारे नसून सनातन संस्कृतीकडे जाणारे आहे. गरजेच्या ठिकाणी सत्याग्रह करणे महत्त्वाचे असून तो करण्याची भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले.
या वेळी मुस्लिम सत्यशोध पत्रिका विशेषांक, मुस्लिम महिलांच्या समस्या- शोध आणि बोध व समान नागरी कायदा अपेक्षा आणि वास्तव या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. मुस्लिम सत्यशोधक मंडळ कार्यकर्ता मेळावाही रविवारी घेण्यात आला.

Web Title: ... then I would not say 'Bharatmata Ki Jai' - Bhai Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.