...तर जीवावर बेतले असते
By admin | Published: June 22, 2016 01:55 AM2016-06-22T01:55:27+5:302016-06-22T01:55:27+5:30
पारसिक बोगद्याच्या वरील भागात वसलेल्या बेकायदा उदयनगर लगतची संरक्षण भिंत कलल्याचे सकाळी सहा वाजता स्थानिकांच्या निदर्शनास आले.
पंकज रोडेकर/अनिकेत घमंडी/ कुमार बडदे, ठाणे/मुंब्रा
पारसिक बोगद्याच्या वरील भागात वसलेल्या बेकायदा उदयनगर लगतची संरक्षण भिंत कलल्याचे सकाळी सहा वाजता स्थानिकांच्या निदर्शनास आले. मात्र मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक अगोदरच गतप्राण झाली असताना या भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता जलद मार्गावरील वाहतूक कशी थांबवायची, असा पेच निर्माण झाला. अखेर दुपारी दीड वाजता दुरुस्तीचे काम सुरु झाले. या दरम्यान ही भिंत रेल्वे मार्गावर पडली असती व त्याचवेळी वेगात एखादी लोकल तेथून जात असती तर शेकडो लोकांचे प्राण गेले असते व तेवढेच जखमी झाले असते, अशी धक्कादायक माहिती स्थानिक व अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणली.
उदयनगर झोपडपट्टीतील नागरीकांसाठी असलेल्या शौचालयाचे नुतनीकरण सुरु असताना राबिट गोण्यामध्ये भरून ते बोगद्याच्या बाजूला उभारलेल्या संरक्षक भिंतीजवळ ठेवले होते. त्या वजनाने संरक्षक भिंत रेल्वे रु ळाच्या दिशेने कलली. पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूस आणि वरच्या बाजूस वर्षानुवर्षे बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. ही बांधकामे रोखण्याकरिता तसेच दुर्घटना घडू नये याकरिता महापालिकेने ५० फूट उंचीवर १२ फूट रुंद संरक्षक भिंत आठ वर्षांपूर्वी बांधली. त्या भिंतीच्या मध्ये ठिकठिकाणी लोंखडी जाळ््या बसवल्या आहेत. वरील नागरी वस्तीतून सोडण्यात येणारे सांडपाणी सतत या भिंतीकडे येते. अनेकदा बोगद्यातील भिंतीवरून पाणी झिरपत असते. मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाचे पाणी बोगद्यावरील जमिनीत झिरपल्याने सकाळी सहा वाजता बोगद्यावरील रस्ता खचला. त्यामुळे संरक्षक भिंत रेल्वे रु ळाच्या दिशेने कलल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. महापालिकेच्या ही बाब तत्काळ निर्दशनास आणून दिली गेली. मात्र हे काम करायचे तर त्याकरिता रेल्वे वाहतूक रोखणे गरजेचे होते. त्यातच मंगळवारी सकाळपासून मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक रूळावरून घसरल्याने आणि दिव्यात जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्याने दुपारी दीड वाजेपर्यंत जलद मार्गावरील वाहतूक रोखण्याबाबत रेल्वेकडून प्रतिसाद लाभला नाही. त्यानंतर हे काम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पावसाने विश्रांती घेतली म्हणून बरे. पावसाचा जोर कायम राहिला असता आणि ती कललेली भिंत धावत्या लोकलवर कोसळली असती तर काय याचा विचारच करता येत नाही. दुपारी दीडनंतर विशेष मेगाब्लॉकद्वारे भिंतीचा कललेला भाग काढून टाकला.