...तर समृद्धी मार्गाला जमीन नाही - पवार
By Admin | Published: April 3, 2017 06:47 AM2017-04-03T06:47:18+5:302017-04-03T06:48:03+5:30
मुंबई ते नागपूर या महामार्गाचा घाट कोणाच्या समृद्धीसाठी घातला जात आहे?
कल्याण : मुंबई ते नागपूर या महामार्गाचा घाट कोणाच्या समृद्धीसाठी घातला जात आहे? आधीच जिल्ह्यात दोन महामार्ग असताना हा महामार्ग कशासाठी? असे सवाल करीत, शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा मोबदला दिला गेला नाही, तर एक इंचही जागा समृद्धी मार्गासाठी दिली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी दिला.
यासाठी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन उभारेल, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. कांबा गावात ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात ते बोलत होते. समृद्धी मार्गात बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्ष समितीने पवार यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे पवार यांनी समजून घेतले. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार आनंद परांजपे, संजीव नाईक, आमदार ज्योती कलानी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आधी समृद्धी मार्ग तयार केला जाईल. नंतर गावे वसवली जातील. मार्ग तयार करण्यास दहा वर्षे, गावे वसविण्यास दहा वर्षे लागतील. तोवर मोबदल्याच्या अपेक्षेतील शेतकरी खचून ‘वर’ गेलेला असेल. त्यामुळे आधी मोबदला द्या. नंतरच शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पासाठी दिली जाईल, अशी भूमिका पवार यांनी जाहीर केली.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा मांडत आम्ही संघर्ष यात्रा काढली आहे. पण शेतकऱ्यांसाठी तोशिस सोसण्यास सरकार तयार नाही. देशातील राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज घेणाऱ्या कर्जदारांचे दोन वर्षांत जवळपास १२५ लाख कोटींचे कर्ज माफ करण्यास हेच सरकार तयार आहे. पण केंद्रातील भाजपा सरकारला सामान्य माणसाच्या प्रश्नाविषयी जराही कणव, आस्था नसल्याची टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)
>पीक विम्याचा मुद्दा संसदेत मांडणार
भाजपा सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यावर लहान आकाराचे ३५ उद्योगधंदे बंद झाले. त्यामुळे ४० टक्के कामगारांची कामयस्वरूपी नोकरी गेली. त्यांच्या कुटुंबीयांना जबर किंमत मोजावी लागली, असे सांगून शरद पवार म्हणाले, ‘नोटा बदलून देतो’, असे सांगितल्यावर अनेकांनी बँकेत नोटा जमा केल्या. देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ४० हजार कोटी जमा आहेत. महाराष्ट्राच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आठ हजार कोटी जमा आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७८ कोटी जमा आहेत. त्याचे व्याज आणि विम्याची रक्कम यांचा भार बँकेवर पडतो आहे. हा पैसा अद्याप बदलून दिलेला नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतूनच शेतकऱ्यांच्या पीक योजनेसाठी कर्जपुरवठा होतो. त्यांच्या व्यवहाराचा रस्ताच नोटाबंदीने उद््ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांच्या पीककर्ज योजनेलाच सुरुंग लागला आहे. हा मुद्दा मी संसदेत मांडणार आहे, असे त्यांनी सांगितले.
>अहवालाच्या निर्णयावर टीका
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अहवाल तयार करण्याचे काम राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूटला दिले आहे. त्यांचा येथे काय संबंध? शेतकऱ्याच्या आत्महत्येचे कारणच समजून घ्यायचे असेल तर सरकारने गाव-पाड्यावर जाऊन त्या शेतकऱ्याची आई, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी, वडील यांच्याकडून हा प्रश्न समजून घ्यायला हवा, असे पवार म्हणाले.
विरोधकांची एकजूट हवी
लोकशाही दुभंगण्याचे काम भाजपा करीत असल्याने आता विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आवाहन पवार यांनी केले.