"…मग लावा बांबू’’, राज ठाकरेंचा सत्ताधारी आणि विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:38 PM2024-06-24T15:38:04+5:302024-06-24T15:38:32+5:30
Raj Thackeray News: रविवारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांचं नाव न घेता काही लोकांना बांबू लावण्याची आवश्यकता आसल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनीही आज त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता या वादावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
मागच्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टोकाचे आरोप प्रत्यारोप आणि शाब्दिक चिखलफेकीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. दरम्यान, कालपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात बांबू चर्चेत आला आहे. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांचं नाव न घेता काही लोकांना बांबू लावण्याची आवश्यकता आसल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनीही आज त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता या वादावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. लावा म्हणावं बांबू, असं विधान राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक आज झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी राज ठाकरे यांनी ‘’लावा म्हणावं बांबू”, अशी प्रतिक्रिया देत विषय संपवला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात विकासापेक्षा जातीपातीवरून तेढ निर्माण करून हाताला मतं लागताहेत हे नेतेमंडळींना कळलंय. त्यामुळे हे त्याच प्रकारे पुढे जातील. मला वाटतं की, समाजानं ही गोष्ट ओळखण्याची गरज आहे असं आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला होता. या कार्यक्रमामध्ये बांबूचं महत्त्व पटवून देताना मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना बांबू लावला पाहिजे, असं विधान केलं होतं. एकनाथ शिंदे म्हणाले की, बांबू हा ऑक्सिजन अधिक देणारा आणि कार्बन डाय ऑक्साइड अधिक प्रमाणात शोषून घेणारा आहे. बांबूचे एवढे बायो प्रॉडक्ट आहेत की आपण विचारही करू शकणार नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड केली पाहिजे. तसेच काही लोकांना बांबूही लावायला पाहिजे. काही असे लोक आहेत की सकाळीच भोंगा वाजतो. एक भोंगा निघालाय तर दुसरा चालू आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला होता.