...मग शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करा; राष्ट्रपतीपदाच्या चर्चेवर आव्हाड यांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:30 AM2022-06-14T05:30:20+5:302022-06-14T05:30:36+5:30
राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई :
राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. यावर राष्ट्रपती पदासाठी कशाला, शरद पवार यांच्याकडे आताच संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व द्यावे, अशी थेट भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे.
विरोधकांकडे सक्षम पर्याय नसल्याने शरद पवार यांनाच राष्ट्रपती पदाचा उमेदवार करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देशात प्रचंड जनसंपर्क असलेल्या नेत्यांमध्ये शरद पवार यांच्या नावाचा समावेश होते. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात रमणारे ते नेते आहेत. राष्ट्रपती भवनाच्या बंद दाराआडचे शाही राजकारण त्यांना आवडत नाही. राष्ट्रपती पदासाठी संख्याबळ पाहून निर्णय घ्यायला हवा. मात्र, माझे वैयक्तिक मत विचाराले तर शरद पवारांसारखे व्यक्तिमत्व राष्ट्रपती भवनाच्या कोंडवाड्यात स्वत:ला कोंडून घेऊ शकत नाही, असे आव्हाड म्हणाले.
लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीला अजून अडीच वर्षे आहेत. या निवडणुकीसाठी संयुक्त आघाडी करावी लागणार आहे. त्यामुळे आताच शरद पवारांकडे संपुआचे प्रमुख पद द्यावे. आतापासून जुळवाजुळव केली तर २०२४ अवघड जाणार नाही. ही आघाडी करण्याची जबाबदारी जर आजच शरद पवार यांनी स्वीकारली तर निश्चितच येत्या दोन वर्षांत आपल्याला आवश्यक बदल दिसतील, असे आव्हाड म्हणाले.
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कशाला ?
यूपीएकडून राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव आल्यास त्याला आमचा पाठिंबा असेल, समर्थन असेल, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. तर आम आदमी पार्टीनेही पवारांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपती कशाला, मुख्य प्रवाहातील राजकारण सशक्त करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे यूपीएचे प्रमुख पद देण्याची भूमिका मांडली आहे.