...तर ‘मॅरेथॉन’ची आग तात्काळ विझली असती

By admin | Published: November 3, 2016 01:59 AM2016-11-03T01:59:00+5:302016-11-03T01:59:00+5:30

अग्निशमन दलाच्या गाड्यांना दुतर्फा पार्किंगचा अडथळा निर्माण झाला नसता, तर ही आग पंधरा ते वीस मिनिटांच्या कालावधीत विझली असती

... then the 'marathon fire' would have been solved immediately | ...तर ‘मॅरेथॉन’ची आग तात्काळ विझली असती

...तर ‘मॅरेथॉन’ची आग तात्काळ विझली असती

Next


मुंबई : लोअर परळ येथील ‘मॅरेथॉन इनोव्हा’ या व्यावसायिक संकुलाला मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लागलेली आग विझवण्यात, अग्निशमन दलाच्या गाड्यांना दुतर्फा पार्किंगचा अडथळा निर्माण झाला नसता, तर ही आग पंधरा ते वीस मिनिटांच्या कालावधीत विझली असती, असे म्हणणे लगतच्या संकुलातील रहिवाशांनी ‘लोकमत’कडे मांडले.
ऐन दिवाळीत सर्वत्र आतषबाजी सुरू असतानाच, दिवाळीदरम्यान मुंबईत एकूण ४२ आग लागल्याच्या घटना घडल्या. या घटनेपैकी एक घटना लोअर परळ येथेही घडली. ‘मॅरेथॉन इनोव्हा’ या इमारतीच्या लगत वास्तव्य करणाऱ्या ‘मॅरेथॉन इरा’ या इमारतीमधील रहिवासी जयंत ब्रोकर आणि रजत व्होरा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ‘मॅरेथॉन इनोव्हा’ या व्यावसायिक संकुलाच्या दहाव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली.
आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या ‘दैनिक शिवनेर मार्ग’वरील प्रवेशद्वाराकडून घटनास्थळी दाखल झाल्या आणि दोन गाड्या गणपतराव कदम मार्गावरील प्रवेशद्वाराकडून घटनास्थळी दाखल झाल्या.
शिवनेर मार्गावरून घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना दुतर्फा पार्किंगचा सामना करावा लागला. तर गणपतराव कदम मार्गावरून घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही या मार्गावरील दुतर्फा पार्किंगचा फटका बसला. परिणामी, साडेदहा वाजता आग लागल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल होण्यास अग्निशमन दलाच्या गाड्यांना तब्बल साडेअकरा वाजले.
महत्त्वाचे म्हणजे, गणपतराव कदम मार्गावरून घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना येथील प्रवेशद्वारावर अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. परिणामी, दुतर्फा पार्किंगमुळे घटनास्थळी विलंबाने दाखल झालेल्या अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी तब्बल बुधवारी पहाटेचे पावणे दोन वाजले. दरम्यान, ‘मॅरेथॉन इनोव्हा’च्या दहाव्या मजल्यावर लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते. परिणामी, दहाव्या मजल्यापासून पसरलेल्या आगीने सहाव्या मजल्यालाही आपल्या कवेत घेतले होते. (प्रतिनिधी)
>दुतर्फा पार्किंग नसते तर...
शिवनेर आणि गणपतराव कदम मार्गावर वर्षाचे ३६५ दिवस दुतर्फा पार्किंग असते. लोअर परळ रेल्वे स्थानकावरून वरळी नाक्यावर येणाऱ्या प्रवाशांना या पार्किंगचा मोठा फटका बसतो. विशेषत: या पार्किंगमध्ये अवजड वाहनांचाही समावेश असल्याने, ऐन सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीचा बोजवारा उडतो. आगीची घटना घडली, तेव्हाही याच समस्येने उग्र रूप धारण केले. जर येथे दुतर्फा पार्किंग नसते, तर आग लवकर विझली असती, असे ब्रोकर आणि व्होरा यांनी सांगितले.
>रहिवाशांनी केली मदत
‘मॅरेथॉन इनोव्हा’ इमारतीलगत ‘मॅरेथॉन इरा’ही निवासी इमारत आहे. आगीची माहिती मिळताच, या इमारतीमधील रहिवाशांनी संकुलाला अ‍ॅलर्ट केले. शिवाय, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीवर पाण्याचा मारा केला.
>पत्रव्यवहार अनेकदा झाला, पण...
गणपतराव कदम आणि शिवनेर मार्गावरील दुतर्फा पार्किंग हटवण्यासाठी ‘मॅरेथॉन इरा’च्या रहिवाशांनी संबंधित प्रशासनासोबत अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे. त्यानंतर वाहतूक विभागाने योग्य कार्यवाहीदेखील केली आहे. मात्र, काही केल्या पार्किंगचा प्रश्न सुटत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
>...तर मोठी जीवितहानी
‘मॅरेथॉन इनोव्हा’ या व्यावसायिक संकुलामधील विविध कार्यालयांमध्ये सुमारे चार हजार जणांचा स्टाफ कार्यरत आहे. ही आग रात्रीऐवजी दिवसा लागली असती, तर वित्तहानीसोबतच मोठी जीवितहानी झाली असती, असेही ‘मॅरेथॉन इरा’मधील रहिवाशांनी सांगितले.

Web Title: ... then the 'marathon fire' would have been solved immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.