...तर पुन्हा लावावे लागतील मास्क, राज्य कोरोना कृती दल अध्यक्ष डॉ. ओक यांचे मत
By संतोष आंधळे | Published: December 22, 2022 07:19 AM2022-12-22T07:19:33+5:302022-12-22T07:20:12+5:30
चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पॉझिटिव्ह नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व राज्यांना पॉझिटिव्ह नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. लसीकरणाची आपल्याकडची स्थिती उत्तम आहे. मात्र, कोरोना विषाणूमध्ये झालेले जनुकीय बदल तपासून विषाणूचा काही नवीन उपप्रकार (व्हेरिएंट) निर्माण झाला आहे किंवा कसे, याचे परीक्षण सुरू आहे. नव्या उपप्रकाराची तीव्रता अधिक असल्यास कदाचित पुन्हा मास्क लावावे लागतील, अशी शक्यता राज्य कोरोना कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. ओक पुढे म्हणाले की, आपल्याकडे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, चीनमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण कोरोना रोखण्यासाठी उपयुक्त वर्तनाचे पालन करणे गरजेचे आहे. आपल्याकडे कोरोनाचा नवीन उपप्रकार सापडून रुग्णसंख्या वाढत असेल तर स्वसंरक्षणार्थ मास्क लावावा लागण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, सद्य:स्थितीत राज्यभरात कोरोनाचे १३२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ३६ रुग्ण मुंबईतील आहेत. आतापर्यंत ८१ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली. आता कोरोनाचा संसर्ग दर कमालीचा घटला असून रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे निर्बंधमुक्ती करण्यात आली आहे. परंतु चीनमधील कहरामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणांनी सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
लसीची उपयुक्तता आणि परिणामकारकता
एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधक लसींची उपयुक्तता दिसून येत असली तरी ती किती काळ परिणामकारक राहील, हे स्पष्ट नाही. कारण कोरोना संपूर्ण जगासाठीच नवीन आहे. त्यावरील लस बाजारात येऊन दोनच वर्षे झाली आहेत.
लसीची परिणामकारकता शोधण्याबाबत अनेकदा सिरो सर्व्हे करण्यात आले आहेत. त्यात लसीमुळे लोकांमध्ये कोरोनारोधक प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार झाली आहेत किंवा कसे, याची माहिती मिळते.
मुंबई महापालिकेतर्फे ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात सिरो सर्व्हे करण्यात आला असून त्याचे अहवाल नजीकच्या काळात प्राप्त होणार आहेत.