... तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
By Admin | Published: March 7, 2016 03:38 AM2016-03-07T03:38:47+5:302016-03-07T03:38:47+5:30
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न येत्या आठवड्याभरात सोडवले नाहीत, तर ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करू, अशा इशारा कोकण
मुंबई : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न येत्या आठवड्याभरात सोडवले नाहीत, तर ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करू, अशा इशारा कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शासनाला दिला आहे. याबाबत मोते यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांना निवेदन देऊन तातडीने प्रश्न सोडविण्याची मागणीही शिक्षक परिषदेने केली आहे.
मोते यांनी सांगितले की, ‘राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतरांचा आकृतिबंध ठरविण्यासाठी शासनाने शासकीय कमिटी गठीत केली होती. समितीने ८ महिन्यांपूर्वी अहवाल सादर करूनही अंमलबजावणी होत नाही, शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची मागणीही अद्याप प्रलंबित आहे.’
शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही पदवीधर ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीतील तफावत दूर झालेली नाही. याशिवाय विविध मागण्यांवर विधिमंडळात चर्चा झाल्या. तावडे यांनी शिक्षण विभागाला कार्यवाहीचे आदेशही दिले. मात्र, तत्वत: मान्यता मिळाल्यानंतरही आदेश काढण्यात दिरंगाई होत आहे, तर काही मागण्यांबाबत शिक्षण विभाग आदेशांची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करत आहे. परिणामी, शिक्षण विभागाने आणि तावडे यांनी शिक्षक परिषदेमार्फत पाठपुरावा केल्या जाणाऱ्या प्रलंबित मागण्या मार्गी लावल्या नाहीत, तर आंदोलन केले
जाईल. (प्रतिनिधी)