...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:05 PM2024-05-13T22:05:24+5:302024-05-13T22:08:43+5:30
Lok Sabha Elections 2024 : पवार-ठाकरेंच्या मुला-मुलींमुळे त्यांचे पक्ष फुटले आणि त्याचा आरोप मात्र भाजपावर लावला जातोय, असा थेट आरोप अमित शाह यांनी केला.
Amit Shah : धुळे : राज्यात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडले. आता पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाण्यासह नाशिक, धुळ्यामध्ये मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर धुळ्यात आज भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह आले होते. यावेळी शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला राजकारणात पुढे आणायचं आहे, जर पवारांनी मुलीच्या ठिकाणी अजित पवारांना संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, असा दावा अमित शाह यांनी केला.
धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आज अमित शाह यांची सभा पार पडली. यादरम्यान अमित शाह यांनी 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. शरद पवार जर त्यांच्या मुलीच्या जागी अजित पवारांनी संधी दिली असती आणि उद्धव ठाकरे यांनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती, तर त्यांचा पक्ष कधीच फुटला नसता. पवार-ठाकरेंच्या मुला-मुलींमुळे त्यांचे पक्ष फुटले आणि त्याचा आरोप मात्र भाजपावर लावला जातोय, असा थेट आरोप अमित शाह यांनी केला.
याचबरोबर, अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. गेल्या निवडणुकीत त्यांनी माझ्यासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सहमती दर्शविली होती. निवडणुकीनंतर त्यांच्या मनात मुख्यमंत्री बनण्याचा मोह आला. त्याला आम्ही काही करू शकत नव्हतो. त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय होता. पंरतु बाळासाहेबांच्या विचारांना सोडून ते काँग्रेस आणि शरद परवारांसोबत गेले. आज औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे. त्याला विरोध करणाऱ्यांसोबत जाऊन बसले आहेत. त्यामुळे आज बाळासाहेबांचा आत्मा दु:खी झाला असेल की नाही, असा सवाल करत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
दरम्यान, धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आज अमित शाह यांची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्यांचं नाव घेणे सोडले आहे. त्या सावरकरांना माझा नमस्कार. या निवडणुकीत एकीकडे 12 हजार कोटींचे घोटाळे करणारे आणि दुसरीकडे 23-23 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी आहेत. एकीकडे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले तर दुसरीकडे चहा विकणारे नरेंद्र मोदी आहेत. राम मंदिराच्या मुद्द्याला काँग्रेस आणि शरद पवारांनी 70-70 वर्ष अडकवले. ते राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकारले, असे अमित शाह म्हणाले.