...तर राष्ट्रवादी महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येऊ शकेल; जयंत पाटील यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 09:12 PM2019-10-30T21:12:59+5:302019-10-30T21:15:44+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांना मोठा संदेश दिला आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांना मोठा संदेश दिला आहे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका बजावल्यास 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या बळावर सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणाले की, ''दिल्लीसमोर झुकायचं नाही हे शरद पवार यांनी दाखवून दिलं आहे. आता सर्व नवनिर्वाचित आमदारांना माझे आवाहन आहे की त्यांनी सभागृहाच्या कामकाजात जास्तीतजास्त भाग घ्यावा. पुढची पाच वर्षे विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडत राहिले पाहिजे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका बजावल्यास 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या बळावर सत्ता स्थापन करू शकेल,''
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपावाले काश्मीरचा मुद्दा मांडत राहिले. मात्र आम्ही जनतेचे प्रश्न मांडले, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कमी जागांवर लढत जास्त जागा जिंकल्या आहेत. पक्षाला राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेच्या विधिमंडळ नेतेपदी अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला आहे.
आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अजित पवार यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली.