...तर ओबीसींचे शैक्षणिक, नोकरीतील आरक्षण जाईल, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 05:26 AM2021-12-27T05:26:04+5:302021-12-27T05:26:30+5:30
Prakash Ambedkar : एका कार्यक्रमासाठी रविवारी ते नागपुरात आले असता रवीभवन येथे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. इम्पिरिकल डेटा मिळत नसल्याने त्याचा विरोध केला पाहिजे.
नागपूर : ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असाच राहिला तर भविष्यात शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणही धोक्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांची मुस्लीम आरक्षणाबाबतची भूमिका ‘आरएसएस’सारखी असल्याची टीकाही त्यांनी केली.
एका कार्यक्रमासाठी रविवारी ते नागपुरात आले असता रवीभवन येथे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. इम्पिरिकल डेटा मिळत नसल्याने त्याचा विरोध केला पाहिजे. गोवारीसारखी अवस्था होऊ नये, असे ओबीसींना वाटत असेल तर त्यांनी समाजात जागृती करावी. प्रत्येक समाजाने मेळावे घेतले पाहिजेत. आम्ही ओबीसींसाठी आंदोलन केले. मोर्चा काढला. आता जिल्हापातळीवर आंदोलनाची तयारी आहे. ओबीसीने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी आमच्याकडे मत मागायला येऊ नये, असे बोर्ड लावावेत. मत पाहिजे असेल तर आमचे आरक्षण परत द्या, अशी मागणी करावी.
मुस्लीम आरक्षणाबाबत मंत्री नवाब मलिक दिशाभूल करीत आहेत. त्यांची भूमिका वस्तुस्थितीला धरून नाही. मराठा आरक्षणासोबत मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दिले होते. ते आता आरक्षण ५० टक्क्यांवर जात असल्याची भाषा करीत आहेत. आरएसएसची भूमिकासुद्धा मुस्लिमांना आरक्षण मिळू नये अशीच आहे.