...तर काढून टाका : शिवसेना
By admin | Published: November 17, 2016 05:38 PM2016-11-17T17:38:17+5:302016-11-17T17:38:17+5:30
नको असेन तर काढून टाका, असे खुले आव्हान शिवसेना राज्यप्रमुख सुदिप ताम्हणकर यांनी सेनेच्या हायकमांडला दिले आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 17 : नको असेन तर काढून टाका, असे खुले आव्हान शिवसेना राज्यप्रमुख सुदिप ताम्हणकर यांनी सेनेच्या हायकमांडला दिले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी सलगी करणारा कोणताही पक्ष असो, त्या पक्षाच्या नेहमीच मी विरोधात काम करणार आहे. गोवा राज्यप्रमुखपदी नियुक्ती करताना सेनेच्या मुंबईतील नेत्यांनी मगोशी सलगीबाबत आपल्याला अंधारात ठेवले, असा आरोपही ताम्हणकर यांनी केला आहे.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या राज्यप्रमुखपदी नियुक्ती झालेले ताम्हणकर सेनेला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त गेले काही दिवस पसरले आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत त्याबाबत त्यांना बोलते केले. ताम्हणकर म्हणाले की, आपले जे काही म्हणणे आहे ते मुंबईतील नेत्यांना कळविले आहे. पदावरुन काढून टाकले तरी पर्वा नाही. नको असेन तर खुशाल काढून टाकावे.
ताम्हणकर यांना अंधारात ठेवून राज्य उपप्रमुख नेमण्यात आला त्यानंतर ही धुसफूस वाढली. अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष असलेले ताम्हणकर यांच्या मनात मगोचे सर्वेसर्वा तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याबद्दल सुरवातीपासून अढी आहे. वाहतूक खात्यात ढवळीकर यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. खात्यातील लांच लुचपतीचा पैसा ढवळीकराकडे जातो, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
गोवा सुरक्षा मंच पक्षालाही इशारा
भारतीय भाषा सुरक्षा मंचने नुकत्याच स्थापन केलेल्या गोवा सुरक्षा मंचला ताम्हणकर यांनी पक्ष स्थापनेच्यावेळी मुद्दाम उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला होता. गोसुमंने मगोशी सलगी केल्यास तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यापासून फारकत घेतल्यास या पक्षाचे समर्थनही आपण काढीन, असे ताम्हणकर यांनी स्पष्ट केले आहेत.