...तर मग राऊतांनी उद्धव यांनाही चोर म्हटले ! शिंदे गटाचा सभागृहात जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 07:02 AM2023-03-02T07:02:25+5:302023-03-02T07:03:14+5:30
राऊत म्हणजे सकाळचा भोंगा आहे. आज तर त्यांनी हद्द केली. त्यांचे पोलिस संरक्षण काढा, असे शिरसाट म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधिमंडळाला चोर म्हटल्याने संजय राऊत यांनी एकप्रकारे उद्धव आणि आदित्य यांनाही चोर म्हटले आहे. या सभागृहातील सगळ्यांनाच त्यांनी चोर म्हटले आहे. राऊत यांच्या डोक्यात फरक पडला आहे, असा हल्लाबोल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बुधवारी विधानसभेत केला. आम्हाला चोर म्हणता पण आमची मते घेऊनच तर तुम्ही खासदार झालात हे लक्षात ठेवा, असे खडेबोल मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुनावले.
अजित पवार, छगन भुजबळ, भास्कर जाधव, नाना पटोले यांनाही त्यांनी चोर म्हटले आहे. राऊत म्हणजे सकाळचा भोंगा आहे. आज तर त्यांनी हद्द केली. त्यांचे पोलिस संरक्षण काढा, असे शिरसाट म्हणाले.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राऊत यांनी आम्हाला डिवचायचा ठेका घेतला आहे का? आमची मते घेऊन ते खासदार झाले, आम्ही त्यांच्यासारखे मागच्या दाराने आलेलो नाही. या माणसाने शिवसेनेची वाट लावली, उद्धव यांना उल्लू केले. तीस-तीस वर्षे पक्षसेवा करणाऱ्यांना बाहेर काढले. शिवसेनेचा सत्यानाश केला. चोरांची मते घेऊन खासदार झालो, असे वाटत असेल तर राऊतांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
कोण काय म्हणाले?
nमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिवेशन संपण्याच्या आधी राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली.
nभाजपचे कालिदास कोळंबकर, नीतेश राणे यांनी राऊत यांचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी केली.
nसभागृहातील महिला आमदारांना राऊत यांनी वेश्या म्हटले होते, आता सभागृहालाच ते चोरमंडळ म्हणत आहेत, तत्काळ कारवाई करा अशी मागणी शिरसाट यांच्यासह आशिष जयस्वाल, यामिनी जाधव यांनी केली.
अतुल भातखळकर, आशिष शेलार बरसले
भाजपचे अतुल भातखळकर आणि आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केले. जवळच्या माणसाला अटक झाल्याने राऊत यांना नैराश्य आले आणि त्यातून तर ते तसे बोलले नाहीत ना? असा सवाल भातखळकर यांनी केला. राऊत यांच्या विधानाने महाराष्ट्राची जगभरात अप्रतिष्ठा झाली आहे. त्यांचे विधान हा महाराष्ट्रद्रोह आहे. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता अन् बोटचेपेपणा न करता त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी या दोघांनी केली.