...तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल
By admin | Published: May 5, 2017 04:22 AM2017-05-05T04:22:01+5:302017-05-05T04:22:01+5:30
वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे मुंबई महापालिकेचे अस्तित्व संकटात येणार असेल तर शिवसेनेला वेगळा विचार करावा लागेल
मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे मुंबई महापालिकेचे अस्तित्व संकटात येणार असेल तर शिवसेनेला वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पुन्हा भाजपावर निशाणा साधला. जीएसटीबाबत सेनेची भूमिका स्पष्ट आहे. पालिकेला लाचार होऊन केंद्र व राज्य सरकार दरबारी जाण्याची वेळ येणार असेल तर ते चालणार नाही, असे त्यांनी बजावले.
मुंबईमध्ये आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. जीएसटीसाठी लवकरच राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जीएसटीमुळे मुंबई महापालिकेला जकातच्या माध्यमातून मिळणारा महसूल बंद होणार आहे. जीएसटीतून केंद्र सरकारकडून येणारा निधी राज्य सरकारने थेट महापालिकेला देण्याची गरज आहे. यासंदर्भात जीएसटी अधिवेशनात पाठपुरावा करू. महापालिका अबाधित राहिली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. भिकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारी उभे राहावे लागणार असेल, तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला. सेना आमदारांच्या बैठकीतही जीएसटीबाबत चर्चा झाली. या वेळी जकात नाक्यामुळे प्रत्येक नाक्यावर गाड्यांची तपासणी होत होती. त्यामुळे सुरक्षाही राखली जात होती. आता जीएसटीमुळे जकात बंद होणार असल्याने सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
शेतकरी कर्जमाफी आणि अन्य प्रश्नांवरून भाजपाला कोंडीत पकडण्याची शिवसेनेने राज्यव्यापी अभियानाची तयारी चालविली आहे. ७ मे रोजी औरंगाबाद येथील जाहीर सभेने सेनेच्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात मराठवाडा नंतर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातही अभियान चालविले जाणार आहे. शिवसेना आमदारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देतानाच पक्षसंघटना बांधणीवर जोर देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)