...तर स्वप्निलचे प्राण वाचले असते
By admin | Published: July 21, 2016 02:50 AM2016-07-21T02:50:08+5:302016-07-21T02:50:08+5:30
अल्पवयीन प्रेमप्रकरणातून एकाचा बळी गेल्याची घटना मंगळवारी रात्री नेरूळ येथे घडली.
सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- अल्पवयीन प्रेमप्रकरणातून एकाचा बळी गेल्याची घटना मंगळवारी रात्री नेरूळ येथे घडली. या घटनेला जातीवाद मुख्य कारणीभूत असला तरी बघ्याच्या भूमिकेतील नागरिक आणि पोलीस यंत्रणेचा गाफीलपणा हा देखील तितकाच जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. जर एकातरी ठिकाणावरून पीडित कुटुंबाला मदत मिळाली असती, तर कदाचित हा प्रकार घडला देखील नसता.
अवघ्या पंधरा वर्षांचा स्वप्निल आणि चौदा वर्षांची त्याची आर्ची (बदललेले नाव) या दोघांचे आठवीपासून एकमेकांवर प्रेम होते असे समजते. त्यांना एकमेकांची जात माहिती नव्हती किंवा माहिती असली तरी समाजाची भावना त्यांना ज्ञात नसावी. शाळेत एकत्र, क्लासही एकच तर कॉलेजही एक असावे यासाठीही त्यांचा प्रयत्न होता. परंतु केवळ जात म्हणजेच प्रतिष्ठा करून बसलेल्या त्या आर्चीच्या कुटुंबीयांना त्यांची मुलगी दुसऱ्या जातीतील स्वप्निलच्या प्रेमात असल्याचे पचनी पडले नाही. त्या दोघांना वेगळे करण्यासाठी वाटेल ते करण्याचे त्यांनी ठरवले आणि मंगळवारची रात्र स्वप्निलची शेवटची रात्र ठरली. त्याचा तो कॉलेजचा पहिलाच दिवस होता.
बहिणीच्या प्रियकराचा काटा काढायचाच या भावनेतून त्या आर्चीच्या भावाने स्वप्निलचे अपहरण करून धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो ८ ते १० साथीदारांना घेवून स्वप्निल राहत असलेल्या एसबीआय कॉलनीत घुसला. तिथे थेट स्वप्निलच्या कुटुंबीयांना बळजबरीने इमारतीच्या टेरेसवर नेवून खाली टाकण्याची धमकी तो देत होता. यादरम्यान इमारतीमधील रहिवासी जरी सोनावणे कुटुंबीयांच्या मदतीला आले असते, तर त्या प्रिन्सचे एवढे धाडस देखील झाले नसते. दुर्दैवाने तसे झाले नाही व हा प्रिन्स स्वप्निलच्या कुटुंबीयांचे अपहरण करुन घेवून जाण्यात यशस्वी ठरला. एरवी एसबीआय वसाहतीमध्ये जायचे म्हटले तरी सुरक्षा यंत्रणेच्या हजार चौकशांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये त्याठिकाणी ते गुंड घुसले कसे हा देखील मोठा प्रश्न आहे. मुळात स्वप्निलचे अपहरण होवून धमकी मिळालेली, त्याचवेळी पोलिसांनी गांभीर्याने घेणे गरजेचे होते. तसे झाले असते तर हा प्रकार घडलाच नसता. परंतु ज्या उद्देशाने खाकी वर्दी घातलीय, त्या कर्तव्याचाच विसर पडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील संकटकाळी त्यांना मदत नाकारली. शिवाय मुलीच्या कुटुंबापासून तुमची सुटका कोणीच करू शकणार नाही, असाच भास करून दिला. त्यामुळे जीवन आणि मरणाच्या मध्ये गुंतून राहण्यापेक्षा परिस्थितीला सामोरे जात मुलीच्या कुटुंबीयांपुढे हात टेकणे हाच पर्याय त्यांनी मान्य केला. परंतु त्यातही त्यांचा घात झाला. माफीच्या बहाण्याने घरी नेल्यानंतर स्वप्निल व त्याच्या आई- वडिलांवर २५ ते ३० जणांनी हल्ला चढवला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या स्वप्निलला मोठ्या आशेने रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
>पोलिसांची भूमिका संशयास्पद
स्वप्निलचे अपहरण होवून धमकी मिळालेली, त्याचवेळी पोलिसांनी गांभीर्याने घेणे गरजेचे होते. पोलिसांनी या प्रकाराकडे गांभार्याने घेतले असते तर हा प्रकार घडलाच नसता.
पोलीस अधिकाऱ्यांनी देखील संकटकाळी त्यांना मदत नाकारली. शिवाय मुलीच्या कुटुंबापासून तुमची सुटका कोणीच करू शकणार नाही, असा भास करून दिला.