"...तर अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती’’, चिथावणीखोर भाषणांवरून नितेश राणे यांनी अबू आझमींना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 19:24 IST2024-12-21T19:22:44+5:302024-12-21T19:24:37+5:30
Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सभागृहामध्ये समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे आमने सामने आले.

"...तर अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती’’, चिथावणीखोर भाषणांवरून नितेश राणे यांनी अबू आझमींना सुनावले
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सभागृहामध्ये समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे आमने सामने आले. अबू आझमी यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता चिथावणीखोर भाषणांचा उल्लेख केला आणि धर्म आणि महापुरुषांविरोधात होणाऱ्या भाषणांविरोधात कठोर कायदा आणण्याची मागणी केली. तसेच देशात ऐक्य टिकवण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांनी गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी आक्रमक होत अबू आझमी यांनी भाईचाऱ्याची ही शिकवण जर फतवे काढणाऱ्यांना दिली असती तर आज अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती, असा टोला लगावला.
अबू आझमी यांनी चिथावणीखोर भाषणांमुळे निर्माण होणाऱ्या तणावाचा मुद्दा उपस्थित करताना सांगितलं की, अध्यक्ष महोदय मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो की, तुम्ही एका असा कायदा आणा की, जर कुणी कुठल्या धर्माविरोधात, महापुरुषांविरोधात काही बोललं तर त्याला जामीन मिळता कामा नये. तो किमान दोन-चार वर्षे तुरुंगात राहावा आणि किमान त्याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा व्हावी. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भाईचारा असणं आवश्यक आहे. हिंदू-मुस्लिमांमधील नातं तुटलं तर भारत तुटेल. त्यामुळे धर्माविरोधात बोलणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळेल, असा कायदा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज द्यावं. असं केल्यास महाराष्ट्रामधील ५० टक्के कायदा आणि सुव्यवस्था दुरुस्त होईल. एक साहेब सांगतात मशिदीत घुसून मारेन, अरे का मारणार, आमची काय चूक आहे. कुराण वाचू देणार नाही, स्पीकर बंद करणार, अध्यक्ष महोदय, हा देश हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रेमाचा देश आहे. आपापसात मिळून राहणारा देश आहे, असे अबू आझणी यांनी सांगितले, त्यानंतर नितेश राणे यांनी त्यांना तिथेच प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.
अबू आझमी यांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, अबू आझमीजी भाईचारा वगैरे बोलताहेत तसं काही नाही आहे. ते चुकीची माहिती देत आहेत. ते दुसरी बाजू समजून घेत नाही आहेत. आधी गणेश मिरवणुकीवर दगड कोण मारणार, आमची मंदिरं कोण तोडणार. अबू आझमी यांनी भाईचाऱ्याची ही शिकवण जर फतवे काढणाऱ्यांना दिली असती तर आज अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती. अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित समजवा. आम्हाला त्यांचं भाषण ऐकायच आहे. आता आम्ही मंत्री झालोय, आता आम्ही त्यांचं भाषण ऐकणार, अध्यक्ष महोदय, तुम्ही अबू आझमी यांना वस्तुस्थितीला धरून बोलायला सांगा. बाकी सत्य काय आहे हे महाराष्ट्राची जनता चांगल्या पद्धतीने ओळखते, असा टोलाही नितेश राणे यांनी यावेळी लगावला.