...तर आम्ही निवडणूक लढणार नाही; ‘होऊ दे चर्चा’मध्ये उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 03:04 PM2023-09-02T15:04:10+5:302023-09-02T15:04:51+5:30
आपल्याला शेतकऱ्यांशी बोलायची गरज आहे. जशी मन की बात आहे तशी ही जन की बात आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
मुंबई – थोडे दिवसांनी केंद्रात आणि राज्यात आपले सरकार येईल. तेव्हा या लोकांनी घतेलेले सगळे निर्णय टोपलीत घातल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणुकीची तयारी आहे. प्रत्येक गाववाडा, वाडी, बांधावर, सलून, चहाची टपरी, एसटी डेपो सगळीकडे जाऊन लोकांना विचारा. योजना लोकांपर्यंत पोहचल्या असतील तर आनंद आहे. आम्ही निवडणूक लढत नाही. पण खोटे काम करत असाल आणि हिंदुत्वाचा बुरखा घालणार असाल तर तो आम्ही टराटरा फाडल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आम्हाला होऊ द्या चर्चा करायची आहे असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण केलेली कामे लोकांपर्यंत बिंबवावी लागतील. शिवसेनेचे आणि मविआने अडीच वर्षात केलेले काम हे लोक पुसायचे काम करतायेत. मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड सगळ्या महापालिकांची चौकशी करा, पीएम केअर फंडाचीही चौकशी करावी. परंतु स्वत: काय करायचे नाही आणि दुसऱ्याचे वाकून बघायचे हे हिंदुत्व नाही. मुंबई महापालिकेचे नाव बदनाम करू नका. भाजपाची थोतांडे उघडी पाडावी लागतील त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. हिंगोली सभेत मला कळालं की, अतिवृष्टी झाली तेव्हाचे पैसेही शेतकऱ्यांना दिले नाहीत. अतिवृष्टी कधी होऊन गेली, आता शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. पाऊस कधी येणार, पाऊस आला नाही तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. अतिवृष्टीचे पैसे नाहीत मग दुष्काळाचे पैसे कधी मिळणार? शेतकऱ्यांमध्ये जा, त्यांच्याशी बोला असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
मराठवाड्यात १ लाख शेतकरी नैराश्येच्या गर्तेत
आज कांद्याचा प्रश्न भडकलेला आहे. आम्हाला हिंदुत्व बोलायचं. शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होत नाही. अच्छे दिन आलेच नाहीत. १५ लाख अजून आले नाहीत. कित्येक हजार शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही. छोट्या शेतकऱ्यांना पत्नीचे मंगळसूत्र गहान ठेऊन कर्ज घ्यावे लागते. त्यांच्यामागे जप्तीच्या नोटीशी लागतात. नुकताच एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने मराठवाड्यात सर्व्हे केला. या सर्व्हेचा रिपोर्ट भयानक आहे. हा सर्व्हे गेल्यावेळच्या पेरणीच्या आधीचा आहे. मराठवाड्यातील १ लाख शेतकरी नैराश्येच्या गर्तेत आहेत. काही तरी स्वत:चे बरेवाईट करून घेण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यात महागाई, लाठीचार्ज, दुष्काळ, भाववाढ आले. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांशी बोलायची गरज आहे. जशी मन की बात आहे तशी ही जन की बात आहे. लोकांचे ऐकले पाहिजे. लोकांना काय हवे विचारा, प्रामाणिकपणे जे शक्य नसेल ते देता येत नाही ते सांगा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
हे पैसे तुमच्या खिशातून काढले जातायेत
१ रुपयांत पीकविमा योजना याचा अर्थ कळाला का? पीकविम्यात एक हिस्सा केंद्र सरकार टाकते, दुसरा हिस्सा राज्य सरकार टाकते, तिसरा हिस्सा शेतकरी टाकतो. त्या शेतकऱ्यांच्या हिस्स्याचे पैसे राज्य सरकार टाकणार. चांगली गोष्ट आहे. मग १ रुपया तरी कशाला घेताय? पीकविम्याचा अर्ज भरायला १ हजार रुपये आणि १ रुपयांत पीकविमा, हे तेवढ्यापुरते समजू नका. या भूलथापा आहेत. शेतकरी १ रुपयांत पीकविमा घेणार आणि त्याला भरपाई मिळणार २३ रुपये, ३० रुपये, ११० रुपये मग बाकीचा पैसा तुमच्या मित्रांच्या कंपनीत जाणार का? हे पैसे तुमच्या सगळ्यांच्या खिशातून काढले आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला.
लोकांचे श्राप घेऊ नका
न्यायालयाचे निर्णय सोयीनुसार बदलायचे, दिल्लीत वटहुकुम काढला, मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे. मी मुख्यमंत्री असताना २-३ वेळा निती आयोगासोबत बैठक झाली. परंतु कुणीही एकदाही असा प्रस्ताव पुढे आणला नव्हता. मुंबई समर्थ आहे. मुंबईत घोटाळा आता प्रशासक आणल्यानंतर होतोय. आमचा मोर्चा निघाला त्या घोटाळ्याची चौकशी करायची नाही. प्रत्येकाला क्लीनचीट देत चालले. सत्तेचे गुलाम असलेल्यांना मुंबईबद्दल प्रेम नाही. मराठी माणसाला मुंबईचं महत्व आहे. रक्त देऊन मराठी माणसाने मुंबई मिळवली आहे. मुंबई स्वायत्त करायची हा डाव त्या दोघांची आहे. मुंबई तोडू शकत नाही परंतु मुंबईची तिजोरी खाली करायची. दिव्याची रोशनाई म्हणजे विकास नाही. मुंबईची प्रशासकीय यंत्रणा गलथान करून टाकली आहे. सुंदर रंगवलेल्या भिंतीपुढे कचरा साठला आहे हा आमचा विकास आहे. कुणी हुकुमशाह येऊ द्या मुंबई देऊच देणार नाही. लोकांचे श्राप घेऊ नका असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.