...तर प. महाराष्ट्राच्या ताटात काय उरणार?
By Admin | Published: January 15, 2016 01:05 AM2016-01-15T01:05:47+5:302016-01-15T01:05:47+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याची मुळात मागणीच कुणी केलेली नाही; विदर्भातील नेतेच स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आहेत; विदर्भ देणे म्हणजे देशाचा तुकडा पाडणे आहे; विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची मुळात मागणीच कुणी केलेली नाही; विदर्भातील नेतेच स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आहेत; विदर्भ देणे म्हणजे देशाचा तुकडा पाडणे आहे; विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही; पश्चिम महाराष्ट्राशिवाय विदर्भ जगूच शकत नाही, असे गैरसमज हेतूपुरस्सर पसरविले जात आहेत. या लोकांना भडकविणाऱ्या कल्पना आहेत. प्रत्यक्षात मात्र विदर्भ वेगळा झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काही उरणार नाही, हे सत्य आहे, असे परखड मत राज्याचे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
विदर्भ विकास महासभेतर्फे स्व. नाशिकराव तिरपुडे यांच्या जयंतीप्रीत्यर्थ ‘बाळासाहेब तिरपुडे आणि विदर्भ’ या विषयावर श्रीहरी अणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राजकुमार तिरपुडे होते.
अणे म्हणाले, नागपूर विदर्भातील ८३ संस्थांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे ठराव घेतले आहेत. विदर्भातील अकराही जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशननेही ठराव घेतले आहेत. यावरून सर्वांनाच विदर्भ व्हावा, असे वाटते हे स्पष्ट होते. अॅड. अणे म्हणाले, आपल्याला विदर्भ राज्य हा रिझल्ट हवा आहे. प्रत्यक्षात स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात बऱ्याच नेत्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. जो विदर्भ घेऊन चालतो तोच खरा लीडर आहे. त्यामुळे विदर्भवीर जांबुवंतराव धोटे हे आजही आपल्याला लीडर वाटतात, असेही त्यांनी सांगितले.
विकासाची मागणी ही भावनिक असू शकत नाही. केळकर समितीने सिंचनाचा आर्थिक अनुशेष संपला असून भौतिक अनुशेष मात्र कायम असल्याचे ते म्हणाले. आपली गरज काय आहे हे पाहून मागणी करायला हवी असे सांगताना नाशिकराव तिरपुडे यांना वास्तविक विकास हवा होता, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.
काँग्रेसचे योगदान मोठे : अ.भा. काँग्रेस समितीने १९२० मध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव घेतला होता. विदर्भाच्या चळवळीत काँग्रेसचे योगदान मोठे आहे. विदर्भातील काँग्रेस नेते सत्तेत राहून विदर्भाच्या विकासासाठी झटत राहिले. नाशिकराव तिरपुडे पक्षात राहून विदर्भावर बोलायचे. नितीन राऊतही बोलतात. गडचिरोली, चंद्रपूर भागातील काँग्रेसचे आमदारही विदर्भाचा आवाज बुलंद करताना दिसतात, असेही अॅड. अणे यांनी सांगितले.
जनमतच्या मागणीवर ठाम
लोकभावना या जनमतातून कळत असतात. वेगळ्या विदर्भासाठी जनमत घेण्याच्या मागणीवर आपण ठाम आहोत. ५१ टक्के लोकांना विदर्भ नको असेल आम्ही विदर्भाची मागणी सोडून देऊ, असे आव्हानही त्यांनी पुन्हा एकदा कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.