नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांवर १,०६४ खटले
By admin | Published: December 27, 2015 01:56 AM2015-12-27T01:56:07+5:302015-12-27T01:56:07+5:30
जिल्हा न्यायालयांतर्गत बाल न्यायालयात नोव्हेंबर २०१५पर्यंत १,०६४ खटले सुरू असून, त्यामधील संशयित बालगुन्हेगारांची संख्या दीड हजारांच्या आसपास आहे़ पोलीस आयुक्तालयातील
- विजय मोरे, नाशिक
जिल्हा न्यायालयांतर्गत बाल न्यायालयात नोव्हेंबर २०१५पर्यंत १,०६४ खटले सुरू असून, त्यामधील संशयित बालगुन्हेगारांची संख्या दीड हजारांच्या आसपास आहे़ पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांची संख्या ११०वर पोहोचली आहे़ त्यात खून, बलात्कार, चोरी आदी गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे़
येथील न्यायालयात दाखल बालगुन्हेगारांची संख्या लक्षात
घेता त्यासाठी स्वतंत्र न्यायालय
सुरू करावे लागले आहे. शहरातील एका प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात गावठी बॉम्बचे पार्सल पाठविणे, मालेगावातील व्यावसायिकाच्या मुलाची २० लाखांच्या खंडणीसाठी झालेली हत्या, इगतपुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अशा काही घटनांचा त्यात समावेश आहे.
जिल्हा न्यायालयातील खटल्यांमध्ये चोरी, मारामारीच्या गुन्ह्यांमध्ये १६ ते १८ वयोगटातील बालगुन्हेगारांची संख्या अधिक आहे़ बलात्कार, खुनाच्या घटनांमध्ये बालगुन्हेगारांचे प्रमाण तुलनेत कमी आहे़
बालगुन्हेगारीत महाराष्ट्र दुसरा
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१४च्या आकडेवारीनुसार, फौजदारी गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या बालगुन्हेगारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे़
संसदेने नवीन कायदा करून बालगुन्हेगारांचे वय १६ वर्ष केल्याने अल्पवयीन मुलांमध्येही कायद्याचा धाक निर्माण होईल. गुन्हेगारी कृत्य करण्यापूर्वी अल्पवयीन मुलेही निश्चित विचार करतील़
- शैलेश सोनवणे,
सरकारी वकील,
जिल्हा बालन्यायालय