दुरंतोचे महाराष्ट्रात अनेक थांबे
By admin | Published: September 9, 2015 12:28 AM2015-09-09T00:28:02+5:302015-09-09T00:28:02+5:30
राजधानी, शताब्दीपेक्षाही सुसाट वेगात विनाथांबा धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसची कमालीची मोहिनी रेल्वेप्रवाशांवर असल्याने, ज्या मार्गावर या ट्रेनची लोकप्रियता तुलन्ोने कमी आहे
- रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
राजधानी, शताब्दीपेक्षाही सुसाट वेगात विनाथांबा धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसची कमालीची मोहिनी रेल्वेप्रवाशांवर असल्याने, ज्या मार्गावर या ट्रेनची लोकप्रियता तुलन्ोने कमी आहे तिथे उत्पन्न वाढीसाठी थांबे देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. मुंबईतून सुटणाऱ्या १२ आणि महाराष्ट्रातून जा-ये करणाऱ्या १४ दुरंतोंना हा निर्णय एक सप्टेंबरपासून लागू झाला. देशभरातील २७ पैकी २३ दुरंतोंच्या उत्पन्न वाढीसाठी व्यावसायिक थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता.
पूर्वीचाच वेळ कायम राहावा म्हणून १०० ते ११५ हा पूर्वीचा दरताशी वेग आता वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, लोणावळा, भुसावळ, इगतपुरी, कसारा, बल्लारशा, मनमाड, पनवेल, वसई रोड व रत्नागिरी या ११ स्थानकांवर या मार्गावरून जा-ये करणाऱ्या सर्व दुरंतो थांबत आहेत.
दुरंतोच्या लोकप्रियतेचा अभ्यास केल्यानंतर उत्पन्न वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा भाग म्हणून रेल्वे बोर्ड व मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. जिथे सध्या टेक्निकल हॉल्ट आहे, अशा ठिकाणी व्यावसायिक थांबा दिला गेला आहे.
पुणे - हावडा या ट्रेनसाठी मनमाड, भुसावळ व नागपूर, मुंबई - हावडासाठी इगतपुरी, भुसावळ, नागपूर, बिलासपूर, निजामुद्दीन - पुणेसाठी वसई रोड, लोणावळा, रतलाम व कोटा, नागपूर - मुंबईसाठी कसारा व भुसावळ, पुणे - अहमदाबादसाठी वसईराड, मुंबई - नवी दिल्लीसाठी बडोदा, रतलाम, लोकमान्य टिळक टर्मिनस - एर्नाकुलमसाठी रत्नागिरी - मडगाव, चेन्नई - निजामुद्दीनसाठी नागपूर- बल्लारशा, इटारशी, लोकमान्य टिळक टर्मिनस - अलाहाबादसाठी इगतपुरी, भुसावळ, इटारशी, सिकंदराबाद - मुंबईसाठी पुणे, इंदूर - मुंबईसाठी बडोदा, उज्जैन, जयपूर - मुंबईसाठी बडोदा, रतलाम, हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलमसाठी रत्नागिरी, पनवेल, मडगाव या टेक्निकल थांब्यांचा विचार झाला.
सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला
देशभरात सध्या २७ दुरंतो असून, यापैकी १४ दुरंतो महाराष्ट्राच्या विविध भागांतून जा-ये करतात, तर १२ दुरंतो मुंबईतूनच सुटतात. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील प्रवाशांंना होणार आहे. या सर्वच दुरंतोंना थांबे दिले आहेत.
दर्डांकडून प्रभू, सिन्हांचे अभिनंदन
दुरंतोची उपयोगिता व ज्या ठिकाणी या ट्रेनला टेक्निकल हॉल्ट दिला आहे, त्या स्थानकांवरून प्रवाशांना चढ-उताराची परवानगी रेल्वेने दिली पाहिजे. यामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढेल, अशी मागणी करणारे पत्र ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी माजी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे व सदानंद गौडा यांना दिले होते. याबाबत पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतल्याने त्यांचे अभिनंदन करणारे पत्र दर्डा यांनी दिले आहे.
रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. मुंबईतून सुटणाऱ्या आणि राज्यातून जा-ये करणाऱ्या दुरंतोंना हा निर्णय एक सप्टेंबरपासून लागू झाला.