राज्यात बर्ड फ्लूचे मानवी प्रकरण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:47+5:302021-01-08T05:53:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असतानाच आता इतर राज्यांत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असतानाच आता इतर राज्यांत बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. पण मुंबई अथवा महाराष्ट्रात बर्ड फ्लू निदर्शनास आलेला नाही. तरीदेखील कच्चे मांस खाऊ नये. अधिकाधिक स्वच्छता राखावी, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
कोरोनासारख्या आजाराचे थैमान सुरू असतानाच बर्ड फ्लूने डोके वर काढले तर अडचणी आणखी वाढतील, असे तज्ज्ञ व्यक्तींचे म्हणणे आहे. मुळात कोंबड्या आणि बदके यामध्ये हा आजार दिसून येत असून, मुंबईत अद्याप तरी याबाबत काही आढळलेले नाही. तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे म्हणणे मांडले जात आहे.
दरम्यान, बुधवारी ठाणे येथे १५ बगळे मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण बर्ड फ्लूबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची करडी नजर आहे.
मुंबईत डझनभर कावळ्यांचा मृत्यू
n मुंबई : महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही, असे सरकार सांगत असले तरीदेखील गेल्या १५ दिवसांपासून चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी परिसरात डझनभर कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
n चेंबूर येथील पर्यावरण रक्षक प्रमोद नाईक यांनी याबाबत सांगितले की, गेल्या १५ दिवसांपासून येथे कावळ्यांचा मृत्यू होत आहे. याबाबतची माहिती मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला दिली.
n तसेच समाज माध्यमावरदेखील माहिती दिली. मी पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यांनी माझी तक्रार लिहून घेतली. मात्र कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे होत आहे? याबाबत काम करणे गरजेचे आहे.