युवकांसाठी शिक्षण सुधारणा आणि रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध
By admin | Published: February 1, 2017 03:25 PM2017-02-01T15:25:37+5:302017-02-01T16:00:23+5:30
मनरेगा, रस्ते बांधणी आणि मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांचे प्रकल्प यावर भरीव तरतूद केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - मनरेगा, रस्ते बांधणी आणि मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांचे प्रकल्प यावर केलेली भरीव तरतूद तसेच देशाला ‘इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र’ बनवण्याच्या घोषणेमुळे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी भारतीय युवकांच्या पदरात भरभरून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेता डळमळीत असताना केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे भारतीय तरुणांसाठीच्या रोजगाराच्या संधीत वाढ होणार असल्याचे सूतोवाच अरुण जेटलींनी केले आहेत.
आयआयटी आणि वैद्यकीय शिक्षणासह सर्व प्रकारच्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीच्या परीक्षा घेण्याची एकच पद्धत निर्माण केली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी ‘राष्ट्रीय परीक्षा बोर्डा’ची स्थापना करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंदांचा दाखला देत देशातील युवाशक्तीला उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता असल्याचे जेटली म्हणाले आहेत. देशातील उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेचे वार्षिक मूल्यमापन, शास्त्र विषयांच्या शिक्षणावर विशेष भर आणि उच्च दर्जाची गुणवत्ता सिद्ध करणारी महाविद्यालये तसेच शिक्षण संस्थांना ‘स्वायत्तता’ देण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) कार्यपद्धतीत मूलभूत बदलांची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेत प्रतिवर्षी जास्तीच्या 5000 जागांची निर्मिती केली जाणार
1. सर्व प्रवेश परीक्षांसाठी केंद्रीय व्यवस्था
2. उच्च गुणवत्तेत सातत्य राखणारी महाविद्यालये, शिक्षणसंस्थांना स्वायत्तता
3. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधार
4. वैद्यकीय शिक्षणासाठी 5000 अधिक जागा