राज्यात १६ जण निरीक्षणाखाली, सोलापूर, लोणावळा येथे रुग्ण आढळल्याच्या अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 05:49 AM2020-03-06T05:49:07+5:302020-03-06T05:49:21+5:30
सध्या १२ जण मुंबईत, तिघे नाशिकमध्ये तर एक नांदेडमध्ये, अशाप्रकारे १६ जण निरीक्षणाखाली आहेत.
मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत आतापर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी १८७ पैकी १७४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी (कोविड - १९) निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन. आय. व्ही. पुणे यांनी दिला आहे. सध्या १२ जण मुंबईत, तिघे नाशिकमध्ये तर एक नांदेडमध्ये, अशाप्रकारे १६ जण निरीक्षणाखाली आहेत. दरम्यान, राज्यातील सोलापूर आणि लोणावळा येथे कोरोना रुग्ण आढळल्याच्या अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. राज्यात पुणे व नागपूर विमानतळावरदेखील कोरोना तपासणीसाठी स्क्रीनिंग सुरू होणार आहे. ५ मार्चपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५८६ विमानांमधील ६९,५०२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व कोरोनाबाधित देशांतील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून ४७४ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत १८७ जणांना भरती करण्यात आले आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ४७४ प्रवाशांपैकी २९५ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
कोरोना प्रतिबंध व नियंत्रणाबाबत प्रत्येक जिल्ह्यानिहाय आढावा घेऊन मुख्य सचिवांनी सांगितले की, यंत्रणेने कोरोनाची धास्ती बाळगू नये, मात्र आवश्यक ती खबरदारी घ्यायला हवी. येथून पुढे आपण सर्वांनी गर्दी होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन टाळायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
>पालिका शाळेत प्रार्थनेवेळी देणार विद्यार्थ्यांना धडे
पालिकेच्या शिक्षण विभागाने गुरुवारी पालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळांना कोरोनाच्या जनजागृतीविषयी विद्यार्थ्यांना धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. या परिपत्रकानुसार, शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज प्रार्थनेच्या वेळी कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे व उपाययोजना याबाबत नियमित मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांमार्फत पालकांना आणि परिसरातील नागरिकांमध्ये कोरोना विषाणूबाबत जनजागृती व्हावी याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
>मुंबईत पाच ठिकाणी विलगीकरणाची सोय
मुंबई येथे कस्तुरबा, राजावाडी, कुर्ला, वांद्रे, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर येथे विलगीकरण कक्षांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये किमान १० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.