आवडीचे महाविद्यालय न मिळाल्याने संभ्रम वाढला
By Admin | Published: July 13, 2017 05:41 AM2017-07-13T05:41:18+5:302017-07-13T05:41:18+5:30
अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यावर, आता सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची लगबग सुरू आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यावर, आता सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची लगबग सुरू आहे, पण अनेक विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. हजारो विद्यार्थ्यांना दुसऱ्या अथवा तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे आता प्रवेश घ्यायचा की नाही, याविषयी स्पष्टता नसल्याने गोंधळलेल्या स्थितीत आहेत, पण अनेक महाविद्यालयांत सीनियर्स या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले आहेत.
मुंबई विभागातील अकरावी आॅनलाइन प्रेवश प्रक्रिया पहिल्यापासूनच गोंधळामुळे सतत चर्चेत राहिली आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पहिला अर्ज भरला, तेव्हा संकेतस्थळात व्यवस्थित सुरूहोते. दुसरा अर्ज भरताना मात्र, विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. रडतखडत अर्ज भरणे पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, पण त्यानंतर पहिली यादी मध्यरात्री १ वाजता जाहीर झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला.
सोमवारी सायंकाळी यादी जाहीर न झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी प्रवेशाचे मेसेज गेले. यामुळे विद्यार्थ्यांनी सोमवारची रात्र जागून मंगळवारी सकाळी महाविद्यालय गाठले, पण त्यानंतर, हजारो विद्यार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचे महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचे समजले. मग या परिस्थिती प्रवेश न घेतल्यास,
दुसऱ्या यादीत नाव येईल का, असा प्रश्न मनात सतावत असल्याने, विद्यार्थी काही प्रमाणात तणावात आहेत.
दुसरीकडे प्रवेश घेतल्यास प्रक्रियेतून बाहेर पडू आणि हवे ते महाविद्यालय मिळणार नाही, म्हणून काही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्यांनी प्रवेश न घेतल्यास, विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडेल. विद्यार्थी महाविद्यालयात आल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी काही महाविद्यालयांनी हेल्पडेस्क सुरूकेला आहे. सीनियर विद्यार्थी अथवा काही ठिकाणी प्राध्यापक विद्यार्थी आणि पालकांना मदत
करत असल्याचे चित्र आहे.
>प्रवेशासाठी वेळ वाढविण्याची मागणी
अकरावीची पहिली यादी मध्यरात्री १ वाजता जाहीर झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी प्रवेश मिळाला की नाही, याची माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी जाता आले नाही.
आता विद्यार्थ्यांना दोनच दिवस मिळणार. त्यामुळे प्रवेशासाठी वेळ म्हणजेच दिवस वाढवून देण्याची मागणी मनविसेतर्फे करण्यात आली आहे, पण गुरुवारी शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन, नंतर निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.