गाव तेथे स्मशानभूमी शेड!
By Admin | Published: February 19, 2016 01:32 AM2016-02-19T01:32:56+5:302016-02-19T01:32:56+5:30
शेवटचा दिवस गोड जावा...या हेतूने जिल्हा परिषदेने ‘गाव तेथे स्माशानभूमी शेड’ हा धोरणात्मक निर्णय घेतला असून, पुढील काळात जिल्ह्यातील २१२ गावांत हे शेड उभारण्यात येणार
पुणे : शेवटचा दिवस गोड जावा...या हेतूने जिल्हा परिषदेने ‘गाव तेथे स्माशानभूमी शेड’ हा धोरणात्मक निर्णय घेतला असून, पुढील काळात जिल्ह्यातील २१२ गावांत हे शेड उभारण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले.
जिल्ह्यात १४०५ ग्रामपंचायती आहेत. यातील २७१ गावांत अद्याप स्माशनभूमीचे शेडच नाहीत. यातील ५९ गावांत जागाच उपलब्ध होत नसल्याने ही शेड होऊ शकली नाहीत. २१२ गावांत जागा आहे, मात्र शेड नाही, अशी परिस्थिती आहे.
उत्तमराव भोंडवे या
हवेली तालुक्यातील संतांच्या विचारांच्या प्रसार करणाऱ्या केंद्राचे प्रमुख. यांनी जिल्ह्यातील स्माशानभूमीशेडविषयी वारंवार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना पत्रव्यवहार करून मागणी केली होती. याचा विचार करून कंद यांनी माहिती घेतली असता, अद्याप २७१ गावांत हे शेड नसल्याचे समोर आले.
त्यामुळे शेवटचा दिवस गोड जावा, असा हेतू समोर ठेवून, पुढील काळात ‘गाव तेथे स्मशानभूमी शेड’ देण्याचा जिल्हा परिषदेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील भोर, वेल्हा,
मुळशी, मावळ, जुन्नर व आंबेगाव या तालुक्यांत धरण पाणलोट क्षेत्रातील दुर्गम भागात सर्वाधिक पाऊस
पडतो. येथे पावसाळ्यात एखाद्या ग्रामस्थाचे निधन झाले, तर
त्याच्या अंत्यविधीला अनेक अडथळे येतात. पत्रे लावून /छत्र्या धरून हा विधी करावा लागतो. काही
वेळेस तर सरण पूर्ण जळतच नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणीही मृतदेहाची हेळसांड होते. त्यामुळे गाव तेथे स्मशानभूमी शेड होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
२० गावांत पर्यावरणपूरक शवदाहिनी
वृक्षातोड होत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. ही वृक्षतोड कमी करण्यास थोडासा का होईना हातभार लावण्यासाठी जिल्हा परिषदेने पर्यावरणपूरक शवदाहिनी देण्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले होते. यासाठी दहा लाखांच्या निधीची तरतूदही करण्यात आली होती. ही योजनाही शेवटच्या टप्प्यात असून, याचा जिल्ह्यातील २० गावांना फायदा होणार आहे. ही शवदाहिनी बिडाची असून, ती जमिनीपासून उंच असते. त्यामुळे ५0 टक्के लाकडाची बचत होणार आहे. यासाठीच्या ई-निविदा काढण्यात आल्या असून, ज्यांनी भाग घेतला आहे, त्यांचा माल तपासणीसाठी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या अहवालानंतर निविदा ओपन केली जाणार आहे.
मृतदेहाची विटंबना टळणार
ग्रामीण भागातत सरण रचणारी माहितीतील माणसंही कमी झाली आहेत. काही ठिकाणी ते सरण नीट न रचल्यामुळे मृतदेहाची विटंबनाही होते. हे टाळण्यासाठीही याची मदत होणार आहे. कारण, या शवदाहिनीवर मृतदेह ठेवला की फक्त त्याच्यावर लाकडं ठेवायची. त्याचा साचा असल्याने कमी लाकडं लागतात. मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सावडण्याच्या वेळेस रक्षा आणि अस्ती अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात. ही शवदाहिनी जाळीची असल्याने रक्षा गळून पडते व अस्थी त्या जाळीवरच असतात. त्यामुळे ते काम सोपं होणार आहे.