"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 05:44 PM2024-09-17T17:44:45+5:302024-09-17T17:47:45+5:30
Maratha OBC Reservation : ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे हे उपोषण करण्यासाठी अंतरवाली सराटीकडे निघाले होते. पण, पोलिसांनी त्यांना वडीगोद्री येथे रोखले.
वडीगोद्री (जालना) - "मनोज जरांगे यांचे लाड जातीयवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात. माझा प्रशासनावर रोष नाही, प्रशासनावर दबाव असल्यामुळे मला रोखण्यात आले आहे", अशी टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.
मनोज जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना अंतरवाली सराटीकडे जात असताना पोलिसांनी वडीगोद्री येथे रोखले.जालना पोलिसांनी वडीगोद्री येथे तगडा बंदोबस्त देखील तैनात होता. गोंदी पोलिसांनी आंदोलक वाघमारे यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम 168 नुसार नोटीस बजावली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
"जरांगेंनी उपोषणाची काही परवानगी घेतलेली नाही. मी परवानगी मागितली आहे. तशी माझ्याकडे पावती पण आहे. मुख्यमंत्री एका समाजाचे लाड करत आहे. असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही. मुख्यमंत्र्याला रातोरात काहीतरी निर्णय घ्यायचे असतील", असा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केला.