‘मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग सोबतचेही सोडून का गेले?’; उद्धव ठाकरेंना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 10:15 AM2022-07-07T10:15:09+5:302022-07-07T10:15:41+5:30

राऊतांचे नातलग आमच्यासाेबत असते तर असे वाक्य वापरले असते काय? आम्ही गद्दारी नाही, तर शिवसेना वाचविण्यासाठी उठाव केलेला आहे, असेही शिरसाट म्हणाले.

‘There is magic in the chief minister post, so why did mla leave? Direct question to Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग सोबतचेही सोडून का गेले?’; उद्धव ठाकरेंना थेट सवाल

‘मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग सोबतचेही सोडून का गेले?’; उद्धव ठाकरेंना थेट सवाल

googlenewsNext

नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्री पदामध्ये एक जादू असते. त्या पदाचा वापर करून मुख्यमंत्री विरोधकांनाही आपलेसे करून टाकतात. पण येथे पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही? असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी ठाकरे यांना केला. जयस्वाल हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते अपक्ष म्हणून विजयी झाले व त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला  होता.

जवळच्यांकडून सेना संपवण्याचा डाव

‘महाविकास आघाडीत अडीच वर्षे गळचेपी झाली. सहनशीलतेचा अंत झाला, त्यामुळेच उठाव केला. आम्ही पक्षातच असून, उध्दव ठाकरे यांच्या जवळच्या लोकांकडूनच शिवसेना संपविण्याचा डाव आहे,’ असा हल्लाबोल माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले शंभूराज देसाई  १५ दिवसांनंतर  बुधवारी प्रथमच साताऱ्यात आले. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

‘ती’ चांडाळचौकडी बाजूला करा - शिरसाट

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यासह ‘मातोश्री’वर असलेली चांडाळचौकडी शिवसेना बुडविल्याविना राहणार नाही. राऊत जे म्हणतील, त्याप्रमाणे शिवसेना सध्या हलते आहे. काही ‘झेलेकरी’ त्यांची पालखी वाहत आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे. ती  चांडाळचौकडी बाजूला केली तरच पक्षाचे भवितव्य असल्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. 

संजय राऊत यांनी गुवाहाटीत गेलेल्या आमदारांना वेश्यांची उपमा दिली. आमच्यासोबत काही महिला आमदार होत्या. त्या रडल्या, गळ्यात पाटी लटकवून कामाठीपुऱ्यात आम्हाला पाठवा, असे ते बोलले. राऊतांचे नातलग आमच्यासाेबत असते तर असे वाक्य वापरले असते काय? आम्ही गद्दारी नाही, तर शिवसेना वाचविण्यासाठी उठाव केलेला आहे, असेही शिरसाट म्हणाले.

आठ दिवसात चमत्कार - जैस्वाल 
शिवसेनेने केलेल्या टीकेला काहीही उत्तर  न देता आठ दिवसात चमत्कार घडेल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केला. 

शिंदे गटाच्या आमदारांचे एकच लक्ष्य संजय राऊत

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी रोखठोकपणे महाविकास आघाडीविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. सत्तांतरनाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. संजय राऊत यांच्यामुळे हे प्रकरण चिघळले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाला व त्यामुळेच उठाव केला, असे या आमदारांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर राऊत उरलीसुरली शिवसेना देखील संपवतील, असा दावाही या आमदारांनी केला.
 

Web Title: ‘There is magic in the chief minister post, so why did mla leave? Direct question to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.