व्यासपीठावर बसायला खुर्ची नाही, निलेश लंके खाली मांडी घालून बसले; शरद पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:32 PM2024-04-19T23:32:51+5:302024-04-19T23:34:07+5:30
Nilesh Lanke : लंकेंना उमेदवारी देऊ नका! विखेंनी उद्योजकाला निरोप देऊन पाठविलेले; शरद पवारांचा गौप्यस्फोट
मागील निवडणुकीत शरद पवारांचा पावसात भिजतानाचा भाषणावेळचा फोटो खूप गाजला होता. आज असाच एक फोटो आला आहे. तो शरद पवारांचा नसून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार निलेश लंके यांचा आहे. व्यासपीठावर बसायला खुर्ची उरली नाही म्हणून निलेश लंके उमेदवार असूनही खाली मांडी घालून बसले होते. या साधेपणावर शरद पवारांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.
निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी आज सभा घेतली. या सभेला आदित्य ठाकरेही उपस्थित होते. यावेळी मंचावर नेत्यांची गर्दी झाल्याने बसायला खुर्च्या अपुऱ्या पडल्या. लंकेंना खुर्चीच उरली नाही. मग लंकेंनी कशाचाही विचार न करता मंचावरच एका कोपऱ्यात बसकन मारली आणि आपले काम सुरु ठेवले. ज्याच्यासाठी सभा होती, तोच व्यक्ती खाली बसला होता.
सुजय विखे पाटलांनी लंके यांना इंग्रजी येत नाही, त्यांनी पाठांतर करून इंग्रजीत फाडफाड बोलून दाखवावे, तर आपण उमेदवारी मागे घेईन असे आव्हान दिले होते. यावर शरद पवारांनी सुजय विखेंना प्रत्यूत्तर दिले आहे. लोकसभेत मी कितीतरी वेळा इंग्रजी, हिंदी आणि मराठीतही प्रश्न मांडले आहेत. तिथे कोणत्याही भाषेत बोलता येते. त्या भाषेचे अस्खलीतपणे भाषांतरही केले जाते, यामुळे लंकेंना खासदार होण्यासाठी इंग्रजी यायलाच हवी असे नाहीय, असा जोरदार युक्तीवाद केला.
तसेच आज लंके दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस होता. शरद पवारांनी लंकेंसाठी फुले आणली होती. ती त्यांनी कार्यकर्त्यांना देऊन टाकली. यावरही पवारांनी लंके यांचा स्वभावच तसा आहे म्हणत स्वत:साठी काही ठेवायचे नाही दुसऱ्याला देऊन टाकायचे या वृत्तीचे ते आहेत असे म्हटले. तसेच जनतेत राहणाऱ्या अशा नवऱ्याला सांभाळल्याबद्दल राणी लंके यांचेही पवारांनी आभार मानले.