देवेंद्र फडणवीसांना पद सोडण्याचा पक्षाचा आदेश नाही

By यदू जोशी | Published: June 6, 2024 07:24 AM2024-06-06T07:24:44+5:302024-06-06T07:25:43+5:30

फडणवीस राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठींचा आदेश मानणार, त्यांचा प्रस्ताव नाकारा : बावनकुळेंचा दिल्लीत फोन

There is no party order for Devendra Fadnavis to resign | देवेंद्र फडणवीसांना पद सोडण्याचा पक्षाचा आदेश नाही

देवेंद्र फडणवीसांना पद सोडण्याचा पक्षाचा आदेश नाही

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार व्यक्त केल्याची चर्चा दिल्लीतील पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना फेटाळली. आपल्या भूमिकेवर पक्षश्रेष्ठी देतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असे फडणवीस यांनी पक्षातील आपल्या विश्वासू  सहकाऱ्यांना सांगितले आहे.

पक्षश्रेष्ठींकडून त्यांना पद सोडण्याचा आदेश देण्यात आलेला नाही. त्यांनी स्वत:हून तशी भूमिका घेतलेली आहे; पण ती मान्य केली जाण्याची शक्यता नाही, असेही या नेत्याने स्पष्ट केले. खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी रात्री उशिरा दिल्लीतील पक्षसंघटनेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यास फोन करून फडणवीसांचा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू नका, अशी विनंती केली. 

दिल्लीतील एका बड्या नेत्याने सांगितले की, इतरही राज्यांत भाजपच्या जागा कमी झाल्या पण तिथल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविलेली नाही, पक्षाची ती अपेक्षा नाही. भाजपमध्ये अशी पद्धतही नाही. फडणवीस यांचा प्रस्ताव स्वीकारला तर मग भाजपची कामगिरी खालावलेल्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचेही राजीनामे घ्यावे लागतील, पक्षनेतृत्वाची त्यासाठी तयारी नाही. काही बदल महाराष्ट्रात करायचेच असतील तर ते लगेच केले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांना राजीनामा द्यायला पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याची चर्चा निराधार असल्याचेही या नेत्याने स्पष्ट केले.

महायुतीच्या सरकारमध्ये संतुलनाची महत्त्वाची भूमिका फडणवीस निभावतात. विधानसभा निवडणुकीच्या पाच महिने आधी त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडणे पक्षाला परवडणारे नाही. उलट सरकारमध्ये राहून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी जोमाने काम करण्यास फडणवीस यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून सांगितले जाईल असे सूत्रांनी सांगितले. फडणवीस लवकरच दिल्लीला जाणार असून त्यावेळी पक्षनेतृत्वाकडून त्यांना सरकारमध्येच राहण्याचा आदेश दिला जाईल, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

आधीही दर्शविली होती तयारी 
३० जून २०२२ रोजी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात असतानाच फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आणि आपण मंत्रिमंडळात नसणार अशी घोषणा पत्र परिषदेत करून धक्का दिला होता. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी आपण मंत्रिमंडळात राहिलेच पाहिजे, असा आग्रह धरला. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा आदेश दिला. फडणवीस यांनी त्या आदेशाचे पालन केले.

राजीनाम्यावर ठाम
फडणवीस यांनी पत्र परिषदेत पद सोडण्याची तयारी दर्शविल्यानंतर लगेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आदी त्यांना भाजप कार्यालयातच स्वतंत्रपणे भेटले आणि आपण राजीनामा देण्याची कोणतीही गरज नाही. भाजपच्या दृष्टीने पक्षसंघटना आणि सरकारमध्ये आमचे नेते तुम्हीच आहात असे या नेत्यांनी फडणवीस यांना सांगितले. फडणवीस मात्र राजीनाम्यावर ठाम असून पक्षश्रेंष्ठींचा आदेश आपल्यासाठी अंतिम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: There is no party order for Devendra Fadnavis to resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.