भाजपात राणांसारख्या बाजार बुणग्यांना जागा नाही; भाजप नेत्याची रवी राणांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:53 PM2024-09-04T13:53:36+5:302024-09-04T13:53:55+5:30
रवी राणा यांनी भाजप नेत्यांसमोरच व्यासपीठावर आपण भाजपात प्रवेश करणार नाही असे वक्तव्य केले होते.
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पत्नीला ऐन लोकसभा निवडणुकीसाठी भाजपात पाठवून लढविणारे रवी राणा देखील तयारीला लागले आहेत. आता भाजपारवी राणा यांनाही विधानसभेपूर्वी भाजपात प्रवेश देते की त्यापूर्वीच नवनीत राणा या भाजप सोडून पतीच्या संघटनेत जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच भाजप नेत्याने आमच्या पक्षात राणा सारख्या बाजार बुणग्यांना जागा नाही, असे वक्तव्य केल्याने राणांविरोधात भाजपात वातावरण तयार होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
रवी राणा यांनी भाजप नेत्यांसमोरच व्यासपीठावर आपण भाजपात प्रवेश करणार नाही असे वक्तव्य केले होते. यावरून भाजपचे प्रदेश कार्यकारी सदस्य तुषार भारतीय यांनी रवी राणा यांच्या टीका केली आहे.
रवी राणा यांनी भाजपच्या नेत्यांची मनधरणी करून त्यांना व्यासपीठावर बोलावले होते. त्यांच्या समोरच मी भाजपात प्रवेश करणार नाही असे जाहीर केले होते. अशा वक्तव्यामुळे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा अपमान झाल्याची भावना आहे. राणा यांनी यापूर्वी मोदींचाही अपमान केला आहे. वेळ पडली तर हा व्यक्ती मविआसोबतही जाण्यास तयार आहे, अशी टीका भारतीय यांनी केली.
मागील लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून लढवली होती आणि विजय मिळवला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश करून पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, बच्चू कडू हे नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत नाराज होते. यातच काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. याची सल रवी राणा यांना आहे. यामुळेच अमरावतीत कडू वि. राणा अशी जुगलबंदी सुरु असताना भाजपानेही राणा यांना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
नवनीत राणा जर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्या असत्या, तर केंद्रीय मंत्री झाल्या असत्या. नवनीत राणा यांनी गेली पाच वर्षे विकास केला. खूप मेहनत केली. पण आता ती खड्ड्यात गेली. अमरावतीत आता अशी हवा आली आहे की, जो २० दिवसांपूर्वी आला तो निवडून आला. जर असेच होत राहिले तर राजकारणात चांगले लोक राहणार नाहीत, असे रवी राणा म्हणाले होते.