देशहितासाठी राष्ट्रवादी भाजपासोबत येत असेल तर...; BJP मंत्र्यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 12:24 PM2023-04-13T12:24:01+5:302023-04-13T12:25:26+5:30
महाराष्ट्रात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवारांची विधाने आणि मोदी डिग्री, अदानींबाबत घेतलेली भूमिका यावरून राष्ट्रवादी-भाजपा एकत्र येतील का अशी चर्चा सुरू झाली आहे
मुंबई - राष्ट्रवादी राष्ट्रवादासोबत येत असेल तर त्यात अडचण काय? आम्ही स्वत: राष्ट्रवादासोबत आहोत. जर ते राष्ट्रवादाच्या दिशेने येत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवं असं विधान भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. राज्यात महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. त्यात शरद पवार यांच्या भूमिकेची राज्यात भलतीच चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता भाजपाच्या प्रमुख नेत्याने राष्ट्रवादी-भाजपा एकत्र येण्यावर केलेले विधान महत्त्वाचे ठरत आहे.
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देशाच्या हितासाठी राष्ट्रवादी चर्चा करत असेल तर त्यांचे स्वागत करायला हवे. जर उद्धव ठाकरेंसोबत न जाता ते देशहिताच्या मार्गावर चालणार असतील तर त्यात आमची काहीही हरकत नाही. मार्ग मोठा आहे एक पाऊल त्यांच्याकडून पुढे यायला हवं. मग पाहूया. पुढे काय होते? महाराष्ट्रात जानेवारी, फेब्रुवारीत समीकरण बदलतील. काँग्रेस स्वत: वेगळी होईल असा दावाही त्यांनी केला.
महाराष्ट्रात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवारांची विधाने आणि मोदी डिग्री, अदानींबाबत घेतलेली भूमिका यावरून राष्ट्रवादी-भाजपा एकत्र येतील का अशी चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षात मतभेद आहेत. परंतु सर्वांनी एकविचाराने काम करायला हवं. कार्यक्रम असतील त्यात सर्वांनी सहभागी व्हायला हवं असं शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ठरले. तर अजित पवारांनी नाना पटोलेंना माध्यमांकडे न जाता आधी आमच्याशी चर्चा करा असा सल्ला दिला.
२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली. निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत मिळाले होते. परंतु मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. त्यातून शिवसेना-भाजपा वेगळे झाले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार राज्यात आले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले. मात्र अवघ्या अडीच वर्षात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे मविआ सरकार कोसळले आणि पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजपा सरकार सत्तेत आले. या घडामोडीत राजकीय गणिते बदलली, उद्धव ठाकरेंजवळ केवळ १५ आमदार राहिले तर उर्वरित सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली.