एकनाथ शिंदेंना भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, चंद्रकांत पाटलांकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 08:51 AM2022-06-22T08:51:36+5:302022-06-22T08:54:25+5:30

Chandrakant Patil : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.

There is no proposal from BJP to Eknath Shinde yet, clear from Chandrakant Patil | एकनाथ शिंदेंना भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, चंद्रकांत पाटलांकडून स्पष्टीकरण

एकनाथ शिंदेंना भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, चंद्रकांत पाटलांकडून स्पष्टीकरण

Next

मुंबई : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. विधान परिषद निवडणुकीत सोमवारी भाजपाने दिलेल्या जबर धक्क्यातून महाविकास आघाडी सरकार सावरण्यापूर्वीच शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाशी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना महाराष्ट्राबाहेर नेलं आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान भाजपच्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आम्ही कुठलाही प्रस्ताव एकनाथ शिंदे यांना दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे यांचे सगळ्या पक्षात चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदेंचे बंड आणि त्यातून सरकार स्थापन करण्याचा प्रश्न नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. "एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. ते आमचे जुने सहकारी आहेत त्यांनी आणि आम्ही एकत्र काम केले आहे. पण अजून पर्यंत आमच्याकडून त्यांना कोणताही प्रस्ताव देण्यात आला नाही. महाविकास आघाडीच्या अंतरंगी वादामुळे सरकार पडेल. हा ड्रामा आम्ही सुरू केला नाही तर कधी संपेल हे आम्हाला कसा कळेल?" असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

याचबरोबर, संजय राऊत यांना काय बोलायचं ते कळत नाही, त्यांच्या तोंडाला जे येईल ते बोलतात. पण आमचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. याशिवाय, येणाऱ्या आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा कोण करेल? असे प्रश्न विचारला असता जो मुख्यमंत्री असेल तोच पूजा करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. पहाटे तीनच्या सुमारास गुजरातमधील सूरत येथून निघालेले हे आमदार सकाळी सातच्या सुमारास गुवाहाटी येथे पोहोचले.

Web Title: There is no proposal from BJP to Eknath Shinde yet, clear from Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.