'अंधश्रद्धेसारखं काहीच नाही...'; पोलिसांकडून बागेश्वर महाराजांना क्लीन चिट, श्याम मानव यांना पाठवलं लेखी उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 03:07 PM2023-01-25T15:07:41+5:302023-01-25T15:08:20+5:30
नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रीयांचा 'श्रीराम चरित्र चर्चा' अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा आणि जादू-टोना प्रकाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या तक्रारीनंतर, नागपूरपोलिसांनी बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना क्लीन चिट दिली आहे. महत्वाचे म्हणजे, व्हिडीओमध्ये अंधश्रद्धेसारखे काहीही नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा तक्रारदार श्याम मानव यांना लिखित स्वरुपात उत्तरही पाठवले आहे.
नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रीयांचा 'श्रीराम चरित्र चर्चा' अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा आणि जादू-टोना प्रकाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता.
पोलिसांनी पाठवलं लेखी उत्तर -
श्याम मानव यांच्या तक्रारीनंतर, नागपूर पोलिसांनी तपास केला. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला उत्तर पाठवले आहे. यात पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना क्लीन चिट दिली आहे. नागपूर पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, "व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट झाले की, त्यात धर्मप्रचाराशी संबंधित माहिती आहे. यात अंधश्रद्धेसारखी कुठलीही गोष्ट नाही.
समितीनं केले होते असे आरोप? -
समितीचे अध्यक्ष श्याम मानव म्हणाले होते, धीरेंद्र शास्त्री 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या आडून 'जादू-टोन्या'ला प्रोत्साहन देतात. त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर सामान्य लोकांना लुबाडण्याचा, फसवणूक करण्याचा आणि त्यांचे शोषण केल्याचा आरोपही केला होता. एवढेच नाही, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आव्हान देत, चमत्कार दाखवा, खरे ठरले तर आम्ही त्यांना 30 लाख रुपये देऊ, असेही म्हटले होते.
धीरेंद्र शास्त्रींनी दिले होते उत्तर -
यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी पलटवार करत, 'मी आपले आव्हान स्वीकारतो. श्याम यांनी येथे रायपूरला यावे, तिकिटाचे पैसे मी देईन. आम्ही दिव्य दरबार लावला होतो, तेव्हा श्याम का आले नाही? ते आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व धर्मविरोधी लोक आहेत, असे म्हटले होते. एवढेच नाही, तर 'हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार,' असेही त्यांनी म्हणाले होते. तसेच आम्ही अनेक वर्षांपासून म्हणत आलो आहोत की, आम्ही चमत्कार करत नाही आणि गुरुही नाही, असेही त्यांनी म्हटले होते.