२२-१८-९ मविआचा फॉर्म्युला? १५ जागांवर अद्यापही तिढा; प्रकाश आंबेडकर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:41 PM2024-03-06T12:41:06+5:302024-03-06T12:43:06+5:30
मविआचं जोवर एकमत होत नाही तोवर ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. १५ जागांमधील एखादी जागा आम्ही मागितली तर आम्ही कुणासोबत बोलायचं? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारला.
मुंबई - Prakash Ambedkar on MVA ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यात प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक घेतली. तर शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यातही आज बैठक होत आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून तिढा असल्याने प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे पत्ते उघड करण्यास नकार दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बैठकीत ज्या जागा सुटतील त्या सुटतील. पण पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्यासोबतचा तिढा सुटत नाही. माहितीनुसार, २२, १८, ९ असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. परंतु त्यातील १५ जागांवर तिढा आहे. तो वाद सुटत नाही तोवर हा आकडा खरा आहे असं मी मानत नाही. त्यामुळे त्यांचं ठरल्यानंतर आम्ही आमचे कार्ड उघड करू असं त्यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडीची बैठक आहे असं सांगण्यात येतंय, मात्र तसं नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि माझी अशी ही बैठक आहे. मविआमध्ये काही गोष्टींवरून वाद आहे त्याबाबत मला सांगणार आहेत. मविआची जी चर्चा आहे त्याबाबत ठरणार आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका नाही असं त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अद्याप मविआत जागावाटपावरूनच तिढा आहे. १० जागांवर काँग्रेस-शिवसेना यांच्यात चढाओढ आहे. ५ जागा अशा आहेत ज्यावर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात ठरणं बाकी आहे. एकंदरीत १५ जागांवर एकमत झालेले नाही. ही आमची माहिती आहे. त्यामुळे मविआचं जोवर एकमत होत नाही तोवर ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. १५ जागांमधील एखादी जागा आम्ही मागितली तर आम्ही कुणासोबत बोलायचं? हा तिढा त्यांचा आहे. तो तिढा सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणी होऊ शकत नाही अशी ही परिस्थिती आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.