कुजबुज: कल्याण लोकसभेसाठी मनसे आणि CM एकनाथ शिंदे गटात मनोमिलन?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 09:12 AM2023-12-05T09:12:12+5:302023-12-05T09:13:07+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे कल्याण लाेकसभेच्या उमेदवारीविषयी चर्चा केल्याचा अंदाज राजकीय दिग्गजांमध्ये आहे.
मनोमिलन की प्रतिस्पर्धी?
लाेकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे विविध राजकीय पक्षांसह इच्छुकांची सध्या मांदियाळी सुरू आहे. त्यात खासदार, आमदारांचा वादविवादही सध्या चर्चेचा विषय आहे. यास अनुसरून कल्याण लाेकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमाेद पाटील उर्फ राजू पाटील यांच्यातील विविध मुद्द्यांवर हाेत असलेले वादविवाद चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यात लाेकसभेसाठी पाटील इच्छुक असल्यामुळे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ते वावरत असल्याची चर्चा आहे. शिळफाटा रस्त्यावरून त्यांच्यात अलीकडेच वाद झाला. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे कल्याण लाेकसभेच्या उमेदवारीविषयी चर्चा केल्याचा अंदाज राजकीय दिग्गजांमध्ये आहे. पाटील यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द लक्षात घेऊन त्यांच्या उमेदवारीसाठीही चर्चा झाल्याचे बाेलले जात आहे. त्यामुळे मनोमिलन झाले की प्रतिस्पर्धी म्हणून लढणार याविषयी सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत.
शिवसेनेच्या कंटेनर शाखा फुटपाथवर
ठाण्यात फुटपाथ हे चालण्यासाठी असावेत या उद्देशाने ठाणे महापालिकेने फुटपाथवरून फेरीवाले असतील किंवा इतरांना हटविले आहे. त्यामुळे फुटपाथ थोड्या प्रमाणात का होईना मोकळे झाले. मात्र आता या फुटपाथवरून ठाण्यातील राजकारण तापले आहे. याच फुटपाथवर सध्या क्रेनच्या मदतीने शिवसेनेच्या कंटेनर शाखा उभ्या राहत आहेत. त्यावर आता शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे. फेरीवाले चालतात मग शाखा का चालत नाही? असा सवाल करीत शिंदे गटानेही याचे समर्थन केले आहे. शाखा ताब्यात घेण्यापासून सुरू असलेला वाद आता कंटेनरपर्यंत येऊन ठेपला आहे.
घरे नियमित कधी होणार?
निवडणुका जवळ आल्या की, नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचे आश्वासन दिले जाते. मागील अनेक वर्षांमध्ये सिडकोने घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला. शासनाने घरे नियमित करण्यासाठी मंजुरी दिली अशी आश्वासने वारंवार देण्यात आली. घरे नियमित केल्याबद्दल अनेक लोकप्रतिनिधींचे सत्कारही झाले. पण, प्रत्यक्षात एकही घर अद्याप नियमित झालेले नाही. अनधिकृत झोपड्या अधिकृत ठरवून त्या जागेवर एसआरएची कार्यवाही झाली. पण, ज्यांनी नवी मुंबई वसविण्यासाठी जमिनीचा त्याग केला, त्या भूमिपुत्रांची घरे नियमित कधी होणार, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त विचारू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्याय देणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात असून, यावेळी तरी प्रत्यक्षात घरे नियमित होणार की, पुन्हा निवडणुका जवळ आल्या की, फक्त आश्वासने मिळणार, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.