मुलांशी समरस होणारे शिक्षण हवे

By admin | Published: February 21, 2016 04:04 AM2016-02-21T04:04:22+5:302016-02-21T04:04:22+5:30

‘‘मुलांची शैक्षणिक गुणवत्ता पाहण्यापेक्षा त्यांच्या भावविश्वाशी समरस होणारे शिक्षण देण्याची गरज असून, त्यासाठी देशभरातील शिक्षणतज्ज्ञांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,’’ असे आवाहन

There is a need for education with children | मुलांशी समरस होणारे शिक्षण हवे

मुलांशी समरस होणारे शिक्षण हवे

Next

स्मृती इराणी : ‘लोकमत आयकॉन्स आॅफ एज्युकेशन, महाराष्ट्र’ कॉफीटेबल बुकचे शानदार प्रकाशन

पुणे : ‘‘मुलांची शैक्षणिक गुणवत्ता पाहण्यापेक्षा त्यांच्या भावविश्वाशी समरस होणारे शिक्षण देण्याची गरज असून, त्यासाठी देशभरातील शिक्षणतज्ज्ञांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,’’ असे आवाहन करून विद्यमान शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होण्याची गरज केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केली.
‘लोकमत’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘आयकॉन्स आॅफ एज्युकेशन, महाराष्ट्र’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनाप्रसंगी स्मृती इराणी बोलत होत्या. राज्याचे शालेय, उच्च व तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, समूह संपादक दिनकर रायकर, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष अंजिक्य डी. वाय. पाटील, लोकमतचे प्रेसिडेंट (सेल्स) करुण गेरा व्यासपीठावर होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, सिम्बायोसिस विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांच्यासह लोकमत एज्युकेशन आयकॉन्स, राज्यभरातील शिक्षणसंस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिक्षणतज्ज्ञ व प्राचार्य या वेळी उपस्थित होते.
कोलकाता येथील एका विद्यार्थ्याची गोष्ट सांगून संपूर्ण सभागृहाला स्मृती इराणी यांनी सुन्न केले. त्या म्हणाल्या, ‘‘एका मुलाला कुटुंबावर निबंध लिहिण्यास सांगितले. त्याने लिहिले, ‘वडील दररोज दारू पिऊन येतात. आईला मारहाण करतात. तिला वाचवायला गेलो, तर मलाही मारतात. मला शिक्षण घेऊन पैसे कमवायचे आहेत. आईला घेऊन दुसरीकडे राहायचे आहे.’ या मुलाच्या गोष्टीवरून त्या मुलाची भावनिक स्थिती काय असेल, हे आपल्याला समजू शकते. मुलांच्या या भावना शिक्षकांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्याशी भावनिक बांधिलकी तयार केली पाहिजे. मुलांच्या या भावविश्वाला समजून घेत त्यानुसार शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.’’
केंद्राकडून तयार करण्यात येणाऱ्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत इराणी म्हणाल्या, ‘‘भारतातील नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यासाठी आम्ही वरच्या स्तरापासून खाली येण्याऐवजी खालच्या स्तरापासून वर जाण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शहरी, ग्रामीण भागातील २ लाख संस्थांनी सहभाग नोंदविला आणि आपले म्हणणे लिहून दिले. या सर्वांच्या मंथनातून समग्र असे शिक्षण धोरण तयार करण्यात येत आहे. ३० वर्षांनंतर प्रथमच तळागाळातील लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असलेले शिक्षण धोरण प्रत्यक्षात येईल. हे धोरण प्रत्येक भारतीयाचा आवाज असेल.’’

मतभेद विसरून उभे राहिलो तरच राष्ट्राचे नवनिर्माण शक्य
शिक्षणाला समर्पित असलेल्या एका मंचावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञांचे अनुभव आणि विचारमंथन होत असल्याचा आनंद आहे. यामध्ये सहभागी होण्यास मिळाले हे माझे सौभाग्य मानते. विचारधारेच्या कोणत्याही टोकावर आम्ही असू, राजकारणात आम्हाला कोणत्याही मापदंडाने तोलले जात असले तरी शिक्षण हे असे क्षेत्र आहे तिथे आपण मतभेद विसरून एकत्र उभे राहिलो तर राष्ट्राचे नवनिर्माण शक्य आहे. आजच्या कार्यक्रमातून या नवनिर्माणाचे संकेत मिळत आहेत, असे मत स्मृती इराणी यांनी व्यक्त केले.

मराठी, हिंदी बंधनकारक करावे : विजय दर्डा
प्रत्येक विद्यार्थ्याला हिंदी, मातृभाषा आणि इंग्रजी अशा किमान
३ भाषा यायला हव्यात. मुंबईमध्ये महागड्या शाळांमध्ये हिंदी, मराठी भाषा शिकविल्या जात नाहीत; त्यामुळे राज्य शिक्षण मंडळ, सीबीएससी, आयबीसह सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमधील किमान दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या तिन्ही भाषा शिकवणे बंधनकारक करायला हवे, अशी मागणी विजय दर्डा यांनी केली.
विजय दर्डा म्हणाले, ‘‘देशाच्या भविष्याच्यादृष्टीने शिक्षण हे एक महत्वपुर्ण साधन आहे. या माध्यमाध्यमातून आपण युवकांना, समाजाला, शैक्षणिक, सांस्कृतिक, नैतिक, आर्थिक, धार्मिक, मानवीय मूल्यांची निर्मिती करतो. आज देशात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. जर आपण जगाच्या ज्ञानात आणि ज्ञानाच्या क्षेत्रात विश्वगुरूच्या रुपाने प्रतिष्ठापित होण्यासाठी चांगल्या संसाधनांबरोबच गुणवत्तेचीही निर्मिती करावी लागेल.’’

भाषेप्रति विजय दर्डा यांचे विचार सशक्त
विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात भाषेप्रति आपले सशक्त विचार व्यक्त केले. हे विचार कोणत्याही राजकीय मापदंडात तोलू नयेत, असेही सांगितले. त्यांच्या या विचारांचा मी आदर करते. मातृभाषेप्रति प्रत्येकाला आदर असायला हवा आणि त्यातून शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी भावना स्मृती इराणी यांनी व्यक्त केली.

अडचणीतील महाविद्यालये बंद पडू देणार नाही : तावडे
शिक्षण संस्थांपुढे अडचणी आहेत, याची जाणीव आहे; त्यामुळे अडचणीत असणारी महाविद्यालये बंद पडू न देता त्यांना पुन्हा नव्याने पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

रॅन्चो हवेत की चतुर?
तावडे म्हणाले, प्रश्नपत्रिकेत ‘वर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता. एका विद्यार्थ्याने ‘वधू’ असे उत्तर लिहिले. मात्र बार्इंनी त्याला चूक दिले. कारण आपल्या बालभारतीच्या पुस्तकात ‘वर’च्या विरुद्ध ‘खाली’ असे उत्तर आहे. एका विद्यार्थ्याने देव ‘वर’ देतो त्याला विरुद्धार्थी शब्द ‘शाप’ आहे, असे लिहिले. मात्र तेही चूकच दिले. त्यामुळे मुलांनी झापडे लावून शिकायचे की खरेच ज्ञान घ्यायचे. ‘थ्री इडियट’ या चित्रपटातील रॅन्चो हवेत की चतुर? हा विचार करावा लागेल.

 

Web Title: There is a need for education with children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.