पाचव्या फेरीतूनही अकरावीत प्रवेश नाही
By admin | Published: August 4, 2016 05:53 PM2016-08-04T17:53:34+5:302016-08-04T17:53:34+5:30
पाच प्रवेश फे-या घेवूनही कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नसलेत आम्ही शिकायचं नाही का? असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिका-यांसमोर उपस्थित केला.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ : अकरावी प्रवेशासाठी पाचवी आॅनलाईन प्रवेश फेरी राबवूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश अद्याप मिळाला नाही. परिणामी विद्यार्थी व पालकांनी गुरूवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी करून संंताप व्यक्त केला. पाच प्रवेश फे-या घेवूनही कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नसलेत आम्ही शिकायचं नाही का? असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिका-यांसमोर उपस्थित केला.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश फेरी राबविली जात असून गुरूवारी पाचव्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. मात्र, दहावीत 82 पासून 88 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही या यादीतून प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी दुपारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली.
अकरावीचे वर्ग सुरू होऊन 15 दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला; तरीही आम्हाला प्रवेश मिळात नाही. त्यामुळे आम्ही शिकायचंच नाही का? असा सवाल नेहा पुनम्य या विद्यार्थीनीने रडवेल्या चेह-याने अधिका-यांना विचारला .
82 टक्के गुण मिळविणा-या नेहाने पाचव्या फेरीसाठी आॅनलाईन अर्ज केला.मात्र, तिला घरा जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही.तसेच राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग स्पर्धेपर्यंत खेळणा-या ॠषभ मुरकुटे या विद्यार्थ्याला पाचव्या फेरीत कुठेच प्रवेश मिळाला नाही. आॅनलाईन प्रक्रियेत दोष असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांनी यावेळी सांगितले.